लातूर : सध्या राज्यातील सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण सरकारी सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे. मात्र, राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी आहे. त्यामुळं राहिलेल्या सोयाबीनचे करायचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सोयाबीन खरेदी केंद्र सरु करावीत, या मागणीसाठी लातूरमध्ये (Latur) शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आक्रमक झाला आहे. लातूरच्या निलंगा शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले आहे.
शेतकऱ्यांन प्रतिक्विंटल मागे 1000 रुपयाचा फटका
लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळं सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे. या मागणीसाठी लातूरच्या निलंगा शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सोयाबीन हमीभाव विक्रीपासून वंचित राहिले आहेत. खुल्या बाजारात सोयाबीनला 3 हजार 900 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. तर हमीभाव केंद्रावर 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल दर दिला जायचा. मात्र खरेदी केंद्राची मुदत संपल्याने शेतकऱ्यांन प्रतिक्विंटल मागे 1000 रुपयाचा फटका बसत आहे. त्यामुळं तात्काळ सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शिवसेना ठाकरे गट आणि छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोयाबीनची उधळण करत आंदोलन
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी सोयाबीनची उधळण करून लक्षवेधी आंदोलन केले आहे. नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने 23 हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी विना राहिले आहेत. त्यामुळे याच सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्ते गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी सोयाबीनची उधळण करून आंदोलन केलं.
सोयाबीन खरेदी बंद केल्याने अनेक शेतकरी वंचित
सोयाबीन खरेदी बंद केल्याने अनेक शेतकरी वंचित आहेत. लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन पडून आहे. खरेदी केंद्राबाहेर अजूनही शेतकऱ्यांच्या रांगा असल्याचे अजित नवले म्हणाले. सोयाबीन खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळं सरकारने खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरु करावी अशी मागणी अजित नवलेंनी केली आहे. अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन छेडणार असून, कृषीमंत्र्यांच्या घरावर सोयाबीन ओतणार असल्याचा इशारा डॉ. अजित नवले यांनी सरकारला दिला.