Tomato Price : सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक (Tomato Farmers) शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. कवडीमोल दरानं टोमॅटोची विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. काही ठिकाणी शेतकरी रस्त्यावर टोमॅटो ओतून सरकारचा निषेध करत आहेत. दरम्यान, टोमॅटो दराच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच (Swabhimani Shetkari Saghtana) प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap) यांनी सरकारवर निशाणा साधलाय. शेतकऱ्यांची माती होण्यामागे केंद्र सरकारची नीती कारणीभूत असल्याची टीका जगताप यांनी केंद्र सरकारवर केलीय.
मागील आठ ते दहा दिवसापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जेव्हा टोमॅटोचे मार्केट चांगले होते, तेव्हा केंद्र सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केली, परिणामी राज्यातील टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याचे संदीप जगताप म्हणाले. आज शेतकऱ्यांना एक, दोन रुपये किलोनं देखील पैसे हातात पडत नाहीत, अशा वेळेस केंद्र सरकार झोपा काढत आहे का? असा सवाल जगताप यांनी केला आहे.
सरकारनं नाफेडमार्फत 50 रुपये किलो दरानं टोमॅटोची खरेदी करावी
आता राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारनं नाफेडमार्फत 50 रुपये किलो दरानं टोमॅटोची खरेदी करावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे. यातून शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा द्यावा असे जगताप म्हणाले. टोमॅटो आणि कांद्याचे दर का पडले याबाबत बोलताना जगताप म्हणाले की, याला सरकारचे आयात निर्यातीचे धोरण अवलंबून आहे. कारण आपल्या देशाच्या आजूबाजूच्या देशाचे व्यापारी आपल्या देशाकडून शेतमाल खरेदी करत नाहीत. कारण सरकार कधीही आयात सुरु करते, कधीही निर्यात सुरु करते, ही धोरण शेतमालाचे दर पडण्यास कारणीभूत असल्याचे जगताप म्हणाले.
... अन्यथा केंद्रीय मंत्र्यांच्या दारामध्ये टोमॅटो आणि कांदे ओतू
दरम्यान, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याचे संदीप जगताप म्हणाले. या आंदोलनातून काही तरी सकारात्मक परिणाम व्हावा. केंद्र सरकारला जाग यावी. आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं. जर केंद्र सरकारनं आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाहीतर केंद्रीय मंत्र्यांच्या दारामध्ये टोमॅटो आणि कांदे ओतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना राहणार नाही असा इशारा जगताप यांनी दिला आहे.
टोमॅटो पिकासाठी लाखो रुपये खर्च
लाखो रुपये खर्चून टोमॅटोचं पीकं (Tomato Crop) घेतले असून, सध्याच्या मिळालेल्या भावात मजुरी सुटणे अवघड असल्यामुळं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. कमी दरामुळे लाखो रुपयांचे भांडवल खर्च झालेल्या टोमॅटो शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. आधीच पावसानं दडी मारल्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. अशातच शेतमालाला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: