PM Kisan Samman Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana )31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या ई-केवायसी (eKYC)चे काम 100 टक्के पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत ही विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून गाव पातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क करणे तसेच विशेष शिबीरे घेण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय यापुढील लाभाचे हप्ते लाभार्थ्यांस मिळणार नसल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मोहिमेद्वारे ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची माहिती संबंधित गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, तलाठी कार्यालय, विकास संस्था, बँक, पतसंस्था यांच्या नोटीस फलकावरही तत्काळ लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दवंडी देऊनही याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच यांच्यामार्फत प्रलंबित यादीतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क करुन ई-केवायसीचे महत्व आणि कार्यपद्धती समजावण्यात येणार आहे. मोबाईलद्वारे प्रक्रीया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच नजिकच्या काळात सरकार सेवा केंद्रावरही याद्या उपलब्ध करुन देऊन त्याठिकाणी ई-केवासी पूर्ण करण्याचे काम करेल अशी माहितीही देण्यात आले आहे.


प्रत्येक गावामध्ये सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार


ई-केवायसी प्रकरणी संनियंत्रणासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नेमण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यकांना संबंधित गावात ई-केवायसीसाठी 29, 30 व 31 ऑगस्ट रोजी विशेष शिबीरे घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या तिनही दिवशी संनियंत्रण अधिकाऱ्यांनी गावांमध्ये उपस्थित राहून ई-केवायसीचे काम 100 टक्के पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.


पंतप्रधान किसान योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्याचे ई केवायसी करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. देशातील शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र शासनाने (Central Government) पंतप्रधान किसान योजना राबविण्यात येत आहे. त्यात साधारण चार महिन्याला 2000 याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाते. त्यानुसार सगळ्या खातेदारांचे सातबारा खाते आणि बँक खाते जोडले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: