Snake Farming : आजपर्यंत तुम्ही फळे, भाजीपाला, फुलांच्या लागवडीबद्दल ऐकले असेल. पण तुम्हाला माहित आहे का की असा एक देश आहे जिथे सापांची शेती केली जाते. या देशात साप पाळले जातात. या देशाचं नाव आहे चीन. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सापांचे पालन केले जाते. यातून अनेक लोक करोडो रुपये मिळवत आहेत.  


चीनमधील जिसिकियाओ गावात होतेय सापांची शेती


मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये सापांची शेती केली जाते. चीनमधील ज्या गावात सापांची शेती करतात त्या गावाचे नाव हे जिसिकियाओ आहे. येथील लोक साप पालनावर अवलंबून आहेत. या गावातील प्रत्येक दुसरी व्यक्ती साप पालनाचा व्यवसाय करते. या गावात लाखो विषारी साप आढळतात. अनेक लोक साप पाळतात. इथले लोक किंग कोब्रापासून अजगरापर्यंतचे साप पाळतात.  जिसिकियाओ या गावातील लोक त्यांच्या मांसासाठी आणि शरीराच्या इतर अवयवांसाठी अशा धोकादायक सापांना पाळतात. तसेच अनेक लोक सापाचे विष, कातडे आणि इतर भाग विकून मोठे उत्पन्न मिळवतात.


सापांचे अवयव औषधी बनवण्यासाठीही वापरले जातात


चीनमध्ये सापाचे मांस अतिशय आवडीने खाल्ले जाते. याशिवाय सापाचे अवयव औषधी बनवण्यासाठीही वापरले जातात. तर अनेक प्रजातींचे साप पिशव्या, शूज आणि बेल्ट इत्यादी बनवण्यासाठी वापरतात. जिसिकियाओ या गावात लाकूड आणि काचेच्या छोट्या पेटीत साप पाळले जातात. सापाची पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो.


साप मोठे झाल्यावर त्यांना मारण्यासाठी फार्म हाऊसच्या बाहेर नेले जाते. सर्व प्रथम त्यांचे विष बाहेर काढले जाते. त्यानंतर त्याचे डोके कापले जाते. मग त्यांचे मांस बाहेर काढून बाजूला ठेवले जाते. सापाची कातडी सुकवण्यासाठी वेगळी ठेवली जाते. तसेच मांसापासून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात. बाजारात सापाच्या चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू खूप महाग विकल्या जातात. त्यामुळं साप पालन करणाऱ्या लोकांना यातून चांगले पैसे मिळतात.