Monsoon : शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे स्कायमेट (Skymet) या खासगी हवामान संस्थेने यंदाचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. 2022 सालात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज स्कायमेटने सांगितला आहे. 2022 मध्ये मान्सून सरासरीच्या 97 ते 104 टक्के राहण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार तरी यंदा चांगले पाऊसमान राहणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात स्कायमेटकडून मान्सूनबाबत सविस्तर पूर्वानुमान सांगण्यात येणार आहे.


दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात पावसाळा असतो. या कालावधीत देशात यंदा  97 ते 104 टक्के पाऊस राहण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. दरम्यान, 2021 मध्येही सामान्य मान्सून राहणार असल्याचा अंदाज सांगण्यात आला होता. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जाते.


दरम्यान, याबाबत एबीपी माझाने हवामान अभ्यासक आणि कृषी अभ्यासक उदय देवळाणकर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सलग चौथ्या वर्षी देशात चांगला पाऊस राहण्याचा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेटचा अंदाज हा पूर्णपणे सकारात्मक असल्याचे देवळाणकर यांनी सांगितले. मात्र, पूर्ण पावसाबद्दल बोलायचे झाले तर थोडं थांबावे लागेल, एप्रिलमध्ये येणाऱ्या अंदाजानंतर आपण त्याबद्दल सविस्तर सांगू शकतो असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी आशादायी स्थिती आहे. यंदा पावसाची चांगली सुरूवात होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी सुरूवातीला मरठावाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने ओढ दिली होती. यंदा मात्र, तसे होणार नसल्याचेही देवळानकर यांनी सांगितले. पहिल्या दोन महिन्यांमध्येच जमिनीतील पाण्याची पातळी सुधारेल असे त्यांना सांगितले. बारमाही पिकांना हा पाऊस चांगला आहे. एकूणच शेतकऱ्यांना सपोर्ट करणारा पाऊस असल्याचे देवळाणकर यांनी सांगितले.


2021 मध्ये देशात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली पिके घेता आली होती. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचाही मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे 2021 मध्ये पाहिले. यंदाही चांगला पाऊस राहण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात स्कायमेटकडून सविस्तर अंदाज सांगण्यात येणार आहे. यामध्ये आपल्याला कोणत्या विभागात किती पाऊस राहणार हे सांगता येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: