Market Committee Election : राज्यातील 257  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या  निवडणुकांचे (Market Committee Election) बिगुल वाजलं आहे. येत्या 30 एप्रिलला बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका शिवसेनेचा ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) सोबत लढणार आहे. दोन्ही पक्षांचा सोबत निवडणुका लढवत राज्यातील सहकार क्षेत्रात चंचुप्रवेश करण्याचा प्रयत्न आहे.


सहकार क्षेत्रातील निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रथमच एकत्र लढणार


गेल्या काही महिन्यापूर्वीच शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची घोषणा करण्यात आली होती. आगामी निवडणुकामध्ये ठाकरे गट आणि वंचित एकत्र लढणार असल्याचे सांगितले होते. युतीनंतर राज्यातील सहकार क्षेत्रातील निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रथमच एकत्र लढणार आहेत. प्रत्येक जिल्हा स्तरावर दोन्ही पक्षात वाटाघाटी सुरु आहेत. कालपासून बाजार समित्यांत उमेदवारी अर्ज भरण्याला प्रारंभ झाला आहे.


धुळे बाजार समितीच्या निवडणुकीच्या तयारीला वेग


धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून या निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे भाजपने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला असून दोंडाईचा आणि शिरपूर बाजार समितीत भाजप स्वतंत्रपणे ही निवडणूक लढणार आहे. तर साक्री बाजार समितीत गेल्यावेळी काँग्रेस आणि भाजपचा पॅनल होता. यावेळी आता भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, याविषयी सध्या कोणत्याही हालचाली सुरु झाल्या नाहीत. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय असेल? याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडी देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.


धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री आणि दोंडाईचा या बाजार समितीसाठी निवडणूक


गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. 31 एप्रिलपूर्वी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री आणि दोंडाईचा या बाजार समितीसाठी निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 25 इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला असून 18 जागा आणि 4 हजार 200 मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दोंडाईचा बाजार समितीत भाजपचे जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची सत्ता असून शिरपूरलाही आमदार अमरीश पटेल यांच्यात पॅनलची सत्ता आहे. यामुळं या दोन्ही ठिकाणी भाजपचे स्वतंत्र पॅनल ही निवडणूक लढवणार असून साक्री बाजार समितीत काँग्रेस आणि भाजपचा पॅनल गेल्यावेळी निवडून आले होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून देखील बाजार समितीच्या निवडणुका लढवल्या जाणार असून याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील या बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून कोणत्या बाजार समितीत कोणत्या पॅनलची सत्ता बसते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Shiv Sena-VBA Alliance : शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची युती, उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे दहा मुद्दे