Shambhuraj Desai News : यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं करपली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. अशातच सरकारनं येत्या 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. दरम्यान, याच मुद्यावरुन शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन 5 हजार रुपयांचा दर द्यावा मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. याच मुद्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साखर कारखान्यांना टनामागे 750 रुपयांचे अनुदान द्यावे, असे देसाई म्हणाले. साखर कारखाने सुरु करण्याची घाई नको असेही देसाई म्हणाले. तसेच राजू शेट्टी यांच्या मागणीलाही देसाई यांनी पाठिंबा दिला.
यंदा ऊसाच्या रिकव्हरीमध्ये घट होत असल्याने कारखान्यांना मोठा आर्थिक फटका बसणार
राज्यातील साखर कारखाने 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, यंदा ऊसाच्या रिकव्हरीमध्ये घट होत असल्याने कारखान्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने साखर कारखान्यांना टनामागे 750 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. सध्या कारखान्यांकडे साखरेचा शिल्लक साठा नसून बाजारातही साखरेचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती देसाई यांनी दिली.
शेतकरी आणि कारखानदारांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने टनामागे 750 रुपये अनुदान द्यावे
यंदा ऊसाच्या रिकव्हरीमध्ये सुमारे दीड टक्क्याने घट होत असल्याने कारखान्यांना टनामागे सुमारे 750 रुपयांचा रिकव्हरी लॉस होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या भूमिकेला शंभूराज देसाई यांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी आणि कारखानदारांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने टनामागे 750 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी कारखाने सुरू करण्याची अजिबात घाई करु नये : राजू शेट्टी
जोपर्यंत केंद्र सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत अंतिम आणि लेखी निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी आता कारखाने सुरू करण्याची अजिबात घाई करू नये. जर कोणी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर न करता कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आंदोलनामुळे आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांतील साखर उद्योगावर मोठे सावट निर्माण झाले असून, आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.
