Saffron Farming: केशर म्हटलं की कश्मीर डोळ्यासमोर येणं अटळच. केशर आणि कश्मीरचा समीकरण अतूट आहे पण आता अन्य भागात सुद्धा केशरची शेती करण्याचे प्रयोग कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत. कोरड्या थंड प्रदेशात पिकणारं हे पीक आता शुष्क आणि उष्ण प्रदेशातही घेतलं जाऊ लागलंय. प्रगत तंत्रज्ञानाची जोड देत एखाद्या छोट्याशा खोलीत शीतगृह उभारत केशर शेती केली जाऊ लागलीये. थंड प्रदेशात फुलणार केशराच फुल आता छत्रपती संभाजीनगरच्या रखरखीत मातीत पिकू लागलाय. छत्रपती संभाजीनगरच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांना ही किमया करून दाखवली आहे. राहत्या घरी नऊ बाय बाराच्या खोलीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यानं लाखोंचा उत्पादन घेतलंय. 


लक्ष्मीकांत अपसिंगेकर यांची ही यशोगाथा (Agriculture Success Story) अनेक प्रगत शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी ठरते आहे.  केशर हे पीक तसं कठीण. या पिकातून उत्पन्न मिळवण्याची आशा खरं तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना फारशी नाहीच. केशर पिकवण्यासाठी तापमानाचे आव्हान तसेच शेतकऱ्याच्या संयमाचीही परीक्षाच. पण संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातील संजय हाउसिंग सोसायटीतील रहिवासी असणाऱ्या या निवृत्त कृषी अधिकाऱ्यांन नऊ बाय बाराच्या खोलीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केशर लागवड केली आहे. 


खर्च तंत्रज्ञान आणि वेळेचा ताळमेळ


कश्मीरमधून बाराशे रुपये प्रति कंद या दराप्रमाणे 80 किलोचे कंद विकत घेत सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी केशराची लागवड केली. साधारण 50 दिवसानंतर या कंदाला फुले यायला सुरुवात झाली आहेत. 80 किलो कंदांपैकी 40 किलो कंदाला सध्या फुले लागली असून वातावरण, खर्च, तंत्रज्ञान अशा अनेक आव्हानांना तोंड देत या शेतकऱ्याला 30 ग्रॅम केशर उत्पादन घेण्यात यश मिळाल आहे. मराठवाड्यात केशर उगवू शकतं हे सांगत छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त शेतकऱ्यानं काश्मीरच्या थंड भूमीतलं पीक मराठवाड्याच्या रखरखीत जमिनीवर घेऊन दाखवली आहे. केशर शेतीत पहिल्याच झटक्यात मिळालेल्या या यशातून पहिल्या बॅचमधूनच त्यांना लाखोंची कमाई होण्याची अपेक्षा आहे.  


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह स्थानिक बाजारातही केशराला मागणी 


जगभरात काही प्रमुख देशांमध्ये केशराला मोठी मागणी असून मागणीच्या तुलनेत केशराचे उत्पादन अत्यल्प आहे. स्थानिक बाजारपेठेपासून आंतरराष्ट्रीय बाजारात केशराला किलोमागे सात ते साडेसात लाख रुपये दर मिळतो. यामुळेच आता उष्णकटिबंधीय प्रांतातही केशर उत्पादनाला शेतकरी प्राधान्य देताना दिसतात. भाजी दूध किंवा प्रक्रिया उद्योगात केशराला मोठी मागणी आहे.  स्थानिक बाजारपेठेत 10 ग्रॅम साठी साधारण तीन ते साडेतीन हजार रुपयांचा दर असतो.