Sadabhau Khot : माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील कोंढार भागातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळ शेतकऱ्यांच्या पिकांच मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या केळी, डाळींब, आंबा, मका यासह इतर फळबागांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून तेथील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त भागाचा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखापेक्षा जास्त रुपयाची मदत करावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.


सध्या राज्याच्या विविध भागात पावासाचं आगमन झालं आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाचा सदाभाऊ खोत यांनी पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखापेक्षा जास्त रुपयाची मदत करावी, चालू पिक कर्ज माफ करावं आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी सरकारला केली आहे.


केळीच्या पिकाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत


चांदज गावातील युवराज तांबवे यांच्या केळीच्या शेताला भेट देऊन खोत यांनी पाहणी केली. तीव्र वादळामुळं केळीच्या पिकाचं मोठं नुकसान झालेले आहे.  माढा तालुक्यात बुधवारी आलेले वादळी वारे व पावसामुळे कोंढार पट्ट्यातील हजारो हेक्टर केळीची शेती भुईसपाट झाली आहे. रांझणी, नगोर्ली गारअकुले, आढेगाव, आलेगाव बुद्रुक, आलेगाव खुर्द, वडोली या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी चांदज गावातील युवराज तांबवे यांच्या केळीच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. तीव्र वादळामुळं केळीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. पण याची साधी दखल घ्यायला कृषी विभागाचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार कोणीही फिरकले सुद्धा नसल्याचे खोत यावेळी म्हणाले.




दरम्यान, सदाभाऊ खोत हे सोलापूर जिल्ह्यातील पंचायत राज समितीच्या दौऱ्यादरम्यान आले होते. यावेळी त्यांनी रयत क्रांती संघटनेच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला. 
कार्यकर्ता हा संघटनेचा आत्मा असतो. कार्यकर्त्यांच्या कार्यकुशलतेवर संघटनेची उभारणी होत असते. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, शेतकऱ्यांचे विविध विषयावर भविष्यात आंदोलनाची आखणी, जिल्ह्यातील संघटना वाढीसाठी सर्व आघाडी बांधणी बाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी जिल्हास्तरावरील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या: