मुंबई :  केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील 20 टक्के निर्यात शुल्क (onion exports) पूर्णपणे  हटवले आहे. त्यामुळं आता कांदा निर्यातीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असल्याचे मत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल (Minister Jayakumar Rawal)  यांनी व्यक्त केले. राज्यात  कांदा पिकाची लागवड जास्त झाली आहे, तसेच पोषक हवामान असल्याने उत्पादन जास्त होणार आहे. त्यामुळं कांद्याच्या भावात शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून कांदा पिकावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले जावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती असे रावल म्हणाले.  

Continues below advertisement


1 एप्रिल 2025 पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार


दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारला निर्यात शुल्क हटवण्याच्या बाबत विनंती केली होती. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मागणी लक्षात हे निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले आहे.1 एप्रिल 2025 पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे मंत्री जयकुमार रावल म्हणाले. त्याचबरोबर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे मंत्री रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कृषीमंत्री शिवराज सिंग चव्हाण, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचे आभार मानले आहेत. निर्यात शुल्क हटवल्यामुळं निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होमार आहे. 


कांद्याला पोषक हवामान असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढणार


पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की,  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारला कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रब्बी कांद्याची लागवड झालेली आहे. कांद्याला पोषक हवामान असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढणार आहे. राज्याच्या बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक वाढायला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राबरोबरच  मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये नवीन कांद्याची आवक झपाट्याने वाढत असल्याने बाजारात कांद्याचे  भाव कमी होणार नाही, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय मागणीनुसार निर्यातीचा मार्ग मोकळा झालेला आहे. महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे असे मंत्री रावल यांनी सांगितले.  यंदा कांद्याखालील लागवड क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढले आहे, त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे असे रावल म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! सरकारनं कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवलं, शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी मानले आभार