Ratnagiri : भगवान कोकरे महाराज (Bhagwan Kokare Maharaj) यांच्या गोशाळा उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. त्यांच्या भेटीला आज महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायातील प्रमुख मंडळी गोशाळेत येणार आहेत. भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळं महाराष्ट्रातील देहू, आळंदी, पंढरपूर आदी भागांतून वारकरी संप्रदायाचे प्रमुख मंडळी आज सायंकाळी पाच वाजता येऊन पुढील आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष हरिभक्त परायण प्रकाश महाराज जवंजाळ हे उपोषणाच्या संदर्भातील पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. 


गोशाळेची जागा या संस्थेच्या नावावर होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार 


गेल्या 10 दिवसांपासून भगवान कोकरे महाराज यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. खेड (Khed) तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळेत त्यांचं उपोषण सुरु आहे. जोपर्यंत या गोशाळेची जागा या संस्थेच्या नावावर होत नाही किंवा जागेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असं गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे यांनी सांगितलं आहे.


भगवान कोकरे यांची प्रकृती खालावली 


भगवान कोकरे हे गेल्या दहा दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानं नाराज उपोषणकर्ते भगवान कोकरेंना काल (19 एप्रिल) संध्याकाळी MIDC तुन जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोशाळेतील हजारों गुरे सोडून आंदोलन करणार होते. मात्र, वेळीच पोलिसांनी त्यांना गोशाळेच्या जवळच अडवले. त्याचवेळी उपोषणकर्ते भगवान कोकरे यांची प्रकृती खालवल्याने त्यांना खेडमधील कळंबोली शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून एक तासाच्या उपचारांनंतर पुन्हा भगवान कोकरे उपोषणस्थळी येऊन उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे.  


गोशाळा या जागेवरुन हटवली तर 1100 गुरांचे काय?


जर गोशाळा या जागेवरुन हटवली तर या 1100 गुरांचे काय करायचे? यावरती प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही, म्हणून भगवान कोकरे यांनी दीड महिन्यापूर्वी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. उपोषणाला बसल्यानंतर चौथ्या दिवशी सध्याच्या सरकारमधले आमदार भरत गोगावले, माजी खासदार निलेश राणे, आमदार योगेश कदम आणि सध्याचे सरकारमधील शिवसेनेचे नेते रामदास कदम अशा विविध सरकारमधील लोकप्रतिनिधी नेत्यांनी आश्वासन दिले होते की ही गोशाळा आम्ही तोडू देणार नाही किंवा हटवून सुद्धा देणार नाही. उपोषण स्थगित झाल्यानंतर गोशाळा संस्थापक भगवान कोकरे यांनी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाचा पाठपुरावा केला. प्रशासकीय फेऱ्या मारल्या तरीही जे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाला प्रशासनाकडून यश मिळत नव्हते. कोणत्याही कागदपत्रांवर लेखी प्रशासकीय अधिकारी देत नव्हते. त्यामुळं संस्थापकांनी दहा दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Ratnagiri : कोकरे महाराजांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, लोटे MIDC गोशाळेतील गायींचा प्रश्न ऐरणीवर, वाचा नेमकं प्रकरण काय?