शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार
सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर टाकल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetti : दिल्लीच्या वातानुकूलित दालनात केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उच्चस्तरीय बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर टाकल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. सरकारच्या या उदास भूमिकेमुळं संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी आता थेट आरपारची लढाई जाहीर केली आहे. उद्यापासून (13 ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखून 'चक्का जाम' आंदोलन करण्याचा आक्रमक इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
नेमक्या काय आहेत मागण्या?
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वेगवेगळ्या शेतकरी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत साखरेची MSP वाढवणे, इथेनॉल खरेदी दर 70 रुपये करणे, साखरेचा दर 50 रुपये करणे, त्याचबरोबर कारखाने लवकर सुरु करायचे असतील तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला सरकारने प्रतिटनाला 500 रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. यावर चर्चा झाली मात्र, तोडगा काहीच निघाला नसल्याचे शेट्टी म्हणाले.
आठवडाभरात आम्ही समिती स्थापन करु असं सरकारचं वेळकाढूपणाचे उत्तर
याबाबतचा निर्णय जोपर्यंत तहोत नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरु करुन शेतकऱ्यांचे कारखान्याचे नुकसान, केवळ सरकारची सोय, हे आम्ही होऊ देणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. त्यामुळं उद्या आम्ही राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आठवडाभरात आम्ही समिती स्थापन करु आणि त्यानंतर निर्णय घेऊ असे वेळकाढूपणाचे उत्तर केंद्र सरकारकडून आले आहे, हे समाधानकारण नाही असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
15 नोव्हेंबर पूर्वी एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, शेट्टींचा इशारा
सरकारने 15 ऑक्टोबर पासून ऊसाचा हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र 15 नोव्हेंबर पूर्वी एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्याचबरोबर यंदाच्या ऊस हंगामामध्ये शेतकऱ्याला प्रतिटन 5 हजार 500 रुपये मिळायला हवा अन्यथा कारखाना चालू होऊ देणार नाही असा इशारा देखील दिला आहे. केंद्र सरकार साखर कारखानदारांवर जबरदस्ती करून कारखाने सुरू करण्यास भाग पाडत आहे. मात्र यामध्ये साखर कारखानदार आणि शेतकऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी सरकारच्या दबावात येऊ नये असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.























