Raju Shetti : राज्य शासनानं नियमित पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याची घोषणा केली होती. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये प्रत्येकी 50 हजार रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. याबाबत अजूनही प्रशासकीय पातळीवर सचिव, अधिकारी यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहे. आर्थिक वर्षाच्या निकषामध्ये पुन्हा नियमीत कर्जफेड करणारा  शेतकरी वंचित राहणार असल्यानं, याबाबत पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची यादी ग्राह्य धरुन, शासन निर्णय करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. याबाबतची मागणी राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


ऊस , केळी, द्राक्षे यासारखे बहुवार्षिक पिकांची पिक कर्जे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीची असतात. असे कर्जदार सलग तीन आर्थिक वर्षाच्या कर्ज परत फेडीच्या निकषात बसत नाहीत. तेव्हा वर्षानुवर्षे प्रचलित असलेली डॅा. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेस पात्र असणारे शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरवल्यास कोणताही नियमित कर्जदार शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही. याखेरीज अनेक पाणीपुरवठा व कृषीपुरक सहकारी संस्थांनी सभासदांच्या जमीनी तारण ठेवून त्यावर कर्जे काढून ती कर्जे संस्थेस वापरली व ती कर्जे थकीत ठेवली अशा संस्थाच्या सभासदांना कोणत्याही बॅंकेने पिककर्ज दिले नाही. त्यामुळं सदर सभासद शेतकऱ्यांना खासगी सावकारकडून कर्जे काढून शेती करावी लागली. हे शेतकरी 2007 सालापासून  कोणत्याच कर्जमाफी योजनेस व प्रेत्साहनपर अनुदानास पात्र ठरले नाहीत. त्यामुळं अशा शेतकऱ्यांनाही यामध्ये समावेश करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. 


या प्रमुख मागण्या


महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भुमी अधिग्रहण कायद्यात केलेले बदल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्यातील FRP हे शेतकरी विरोधी निर्णय रद्द करावे. तसेच राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांना थेट नाबार्डकडून 4 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यास केंद्र सरकारला राज्य सरकारकडून शिफारस करावी तसेच शेतीपंपास दिवसा वीज देण्यात यावी या मागण्या राजू शेट्टी यांनी केल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. संबंधित सचिवांना कार्यवाहीबाबत योग्य ते निर्देश दिले असल्याचे शेट्टींनी सांगितले. यावेली स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॅा. जालंदर पाटील , सावकर मादनाईक, डॅा. सोमेश्वर गोलगिरे  उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या: