Raju Shetti on Samruddhi Mahamarg :महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील सुपीक शेतजमीन, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. या विनाशकारी महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी आता आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर करण्यात आला आहे. आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील 13 जिल्ह्यांतील बाधित शेतकरी एकत्र आले असून, 18 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथील ऐतिहासिक वाखरी मैदान येथे सकाळी 11  वाजता शेतकऱ्यांची भव्य जाहीर सभा संपन्न होणार आहे. या सभेनंतर वाखरी ते विठ्ठल मंदिर, पंढरपूर अशी हजारो शेतकऱ्यांची भव्य पायी सदबुध्दी यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 

Continues below advertisement

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील १३ जिल्ह्यांतील शेतकरी पंढरपुरात विठ्ठल चरणी एकत्र येत आहेत. "शेतकऱ्यांची सोन्यासारखी सुपीक जमीन हिरावून घेणारा हा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारने त्वरित रद्द करावा आणि मुख्यमंत्री महोदयांना हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची सुबुद्धी पांडुरंगाने द्यावी," अशी सामूहिक मागणी आणि प्रार्थना या सदबुध्दी यात्रेच्या  माध्यमातून शेतकरी विठूरायाकडे करणार आहेत.

13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा ,कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतजमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. या महामार्गाची कोणतीही आवश्यकता नसताना देवेंद्र फडणवीस यांना 50 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी व केवळ कंत्राटदार आणि भांडवलदारांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

Continues below advertisement

वाखरी येथील सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

यापूर्वीही या 13 जिल्ह्यांत विविध पातळ्यांवर मोर्चे, धरणे आंदोलने आणि ग्रामसभांमध्ये तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका मध्ये महामार्गाविरोधात ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, सरकारने अद्याप हा प्रकल्प अधिकृतपणे आणि पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यासाठी आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात शेतकऱ्यांनी 'पांडुरंग' चरणी न्याय मागण्याचे ठरवले आहे. 18 जुलै रोजी वाखरी येथील सभेत आंदोलनाची पुढील दिशा आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जाणार आहे.

या सदबुध्दी यात्रेस राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील , विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील , खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणितीताई शिंदे , मा. मंत्री महादेव जानकर , आमदार कैलास पाटील , कॅाम्रेड गिरीश फोंडे , यांच्यासह वरील सर्व जिल्ह्यातील शक्तीपीठ विरोधी विविध पक्षांचे आमदार खासदार या यात्रेस उपस्थित राहणार आहेत. हा लढा केवळ जमीन वाचवण्याचा नसून शेतकऱ्यांचे अस्तित्व, संस्कृती आणि रोजगार वाचवण्याचा आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग बाधित 13 जिल्ह्यांतील सर्व शेतकरी बांधव, कष्टकरी, महिला आणि तरुण शेतकऱ्यांनी 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वाखरी (पंढरपूर) येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी समन्वय समिती आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने मा. खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.