Raju Shetti on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस सगळा कारभारच जर नियम आणि कायदे धाब्यावर बसवून करणार असतील तर आम्ही शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी सविनय कायदेभंग केला तर चुकलं कुठं? अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे.

न्याय हक्कासाठी सविनय कायदेभंग केला तर चुकलं कुठं?

शेट्टी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन करणे, कायदा धाब्यावर बसवून पक्ष फोडणे, कायदा धाब्यावर बसवून आमदार -खासदार फोडणे, कायदा धाब्यावर बसवून राज्याचा कारभार चालविणे  करणार असतील, तर कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी सविनय कायदेभंग केला तर चुकलं कुठं? अशी विचारणा त्यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरीही आंबा व काजू बागायतदार आज 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देणारच असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना मदतीबाबत वेळकाढूपणा

अडीच महिने आंबा व काजू उत्पादक शेतकरी रस्त्यावरची लढाई करत असताना राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे ते म्हणाले. आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांची व संघटनांची मंत्रालयात बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्य सरकार विमा कंपनीकडून जाचक अटी व नियमांमुळे पैसे मिळवून देईना, त्याबरोबर एनडीआरएफकडे कोणतीही मदत मागितली नसून तसा प्रस्तावही सादर केलेला नाही. प्रशासन व राज्य सरकारकडून पंचनाम्याच्याबाबतीत कागदी घोडे नाचवले जात आहे. राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदतीबाबत वेळकाढूपणा करू लागले आहेत. 

माजी खासदार विनायक राऊत बोलताना म्हणाले की, कोकणातील शेतकरी आता आत्महत्या करू लागले आहेत. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संकटात टाकले जात आहे. यामुळे राज्य सरकारने मदतीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. आमदार भाई जगताप बोलताना म्हणाले की, आंबा व काजू हे पिक कोकणातील शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखले जात आहे. यंदा हवामानातील बदल, अवकाळी पाऊस या कारणांमुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. पंचनामे करण्याबाबत यंत्रणा अपुरी पडली आहे यामुळे अजून 50 टक्के पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. 

इतर महत्वाच्या बातम्या