Raju Shetti:"मुलगा नोकरीवालाच हवा आणि तो पुणे-मुंबईसारख्या शहरात राहणारा असावा," या हट्टापायी आज महाराष्ट्रातील गावागावांत हजारो तरुण शेतकरी लग्नाविना बसले आहेत. शेतीला 'तोट्याचा व्यवसाय' मानून शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी देण्यास नकार देणाऱ्या आजच्या बुरसटलेल्या सामाजिक मानसिकतेवर कोकणातील एका उच्चशिक्षित मुलीने आपल्या धाडसी निर्णयाने जोरदार प्रहार केला आहे. देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर मुलगी वैष्णवी कदम हिने कोणत्याही कॉर्पोरेट झगमगाटाला किंवा शहरातल्या सुखसोयींना भुलू न देता 'मोंड राणेवाडी' येथील मनोज दळवी या कष्टाळू शेतकरी तरुणाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. तिच्या या प्रेरणादायी निर्णयाची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट तिच्या सासरी जाऊन या नवदाम्पत्याला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मे महिन्यातील 'ती' भेट अन् वैष्णवीचा दांडगा आत्मविश्वास!
माजी खासदार राजू शेट्टी यांनी या कौतुकास्पद घटनेचा सविस्तर प्रवास आपल्या पोस्टमध्ये मांडला आहे. मे महिन्यामध्ये राजू शेट्टी देवगड येथे आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी गेले होते. त्यावेळेस वैष्णवी आणि तिच्या वडिलांनी मेळाव्यात त्यांची भेट घेऊन लग्नाची पत्रिका दिली होती. पत्रिका देत असताना वैष्णवीने मोठ्या उत्साहात आणि आत्मविश्वासाने सांगितले होते, "साहेब, मी इंजिनिअरिंग मधील उच्चशिक्षित मुलगी आहे. मात्र, मी एका शेतकरी मुलाबरोबर लग्न करण्याचे ठरविले आहे. यामुळे माझ्या लग्नाला येवून तुम्हाला आशिर्वाद द्यावेच लागतील." तिचा तो आत्मविश्वास आणि तिने घेतलेला क्रांतीकारी निर्णय ऐकून स्वतः राजू शेट्टी काही क्षणांसाठी अचंबित झाले होते.
शक्तीपीठ महामार्गाचे आंदोलन; लग्न चुकले पण शब्द पाळला
8 मे रोजी वैष्णवी आणि मनोज यांचा विवाहसोहळा पार पडला. मात्र, त्यादरम्यान 'शक्तीपीठ महामार्गाच्या' नियोजित आंदोलनामध्ये व्यग्र असल्याने राजू शेट्टी यांना लग्नाला उपस्थित राहता आले नाही. परंतु, दिलेला शब्द पाळत काल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, राजू शेट्टी यांनी वेळ काढून देवगड तालुक्यातील 'मोंड राणेवाडी' हे गाव गाठले. वैष्णवीच्या सासरी जाऊन तिचे कौतुक करत, तिला साडीचोळीचा आहेर केला आणि नवदाम्पत्याला सुखी संसाराचा आशीर्वाद दिला.
आजच्या भीषण सामाजिक वास्तवावर थेट बोट
या निमित्ताने राजू शेट्टी यांनी आजच्या समाजासमोर उभ्या ठाकलेल्या एका भीषण वास्तवावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याच्याच पदरी आज उपेक्षा आली आहे. शेतीतील अनिश्चितता आणि आर्थिक संकटामुळे आज अनेक मुली आणि त्यांचे कुटुंब शेतकरी मुलाला 'वर' (नवरदेव) म्हणून पसंत करत नाहीत. ही परिस्थिती केवळ एका कुटुंबाची नसून संपूर्ण समाजासाठी एक मोठे सामाजिक संकट बनली आहे. अशा गडद अंधारात वैष्णवीने दाखवलेला हा आशेचा किरण समाजाला दिशा देणारा ठरेल.
शिक्षण म्हणजे केवळ 'मोठी नोकरी' नव्हे
"शिक्षण म्हणजे केवळ मोठी नोकरी मिळवणे किंवा पगाराचे आकडे मोजणे नव्हे, तर योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखणे होय," असे म्हणत राजू शेट्टींनी वैष्णवीच्या सुजाणपणाचे कौतुक केले. वैष्णवीने आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग जोडीदाराचा पगार न पाहता त्याचे 'कर्तृत्व' आणि 'माणुसकी' पारखण्यासाठी केला. मातीशी इमान राखणाऱ्या एका कष्टाळू तरुणाला सन्मान मिळवून देऊन तिने सिद्ध केले की, खरी श्रीमंती विचारांत आणि कष्टांत असते.
शेतकरी पुत्रांच्या मनात फुटली आशेची नवी पालवी!
वैष्णवीने समाजासमोर ठेवलेला हा आदर्श केवळ एक लग्न नसून सामाजिक बदलाची नवी पहाट आहे. जेव्हा अशा प्रकारे उच्चशिक्षित मुली पुढे येऊन शेतकऱ्याचा हात धरतील, तेव्हाच शेतकऱ्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल. वैष्णवीच्या या धाडसी निर्णयामुळे आज लग्नासाठी थांबलेल्या अनेक शेतकरी पुत्रांच्या मनात आशेची नवी पालवी फुटेल, यात शंका नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
