Raju Shetti News : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टीआक्रमक झाले आहेत. गेले अडीच महिने सातत्याने संघर्ष करत आहे. मात्र सरकारकडून म्हणावं तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुजबी चर्चा झाली. पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. राजा उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हातात भोपळा दिला अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली, अशी टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली. राजू शेट्टी यांनी आज सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
15 मे ला गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा
दरम्यान, शेतकऱ्यांना जाहीर केलेली नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. सरकारने नुकसान भरपाई देताना जे निकष लावले त्यातून 70 ते 75 कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी मिळणार आहेत. हे कोकणातील सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. त्यामुळे येत्या 15 मे ला गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढत त्यांना जाब विचारणार आहोत. आम्हाला गृहीत धरले तर वाईट होईल असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे.
वर्षभरात आंबा बागेच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी तीन ते चार लाख रूपये खर्च येतो
रत्नागिरी जिल्ह्यात 65 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पीक घेतले जाते. पण सरकारने हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. यामुळे कोकणातील शेतकरी संघटित होऊन 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक देतील, असे राजू शेट्टी यांनी म्हणाले. एकीकडे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी दरवर्षी 1270 कोटी रुपयांचे परकीय चलन सरकारला मिळवून देतात. असे असताना सरकारने शेतकऱ्यांना संकटकाळात वाऱ्यावर सोडले आहे. वर्षभरात आंबा बागेच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी तीन ते चार लाख रूपये खर्च येतो. यामुळे कर्जाला कंटाळून कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी आत्महत्या करू लागला आहे, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील शेतकरी संघटित होऊन गेल्या दोन महिन्यांपासून लढा देत आहे. गेल्या वर्षभरात खते, कीडनाशके तसेच आंबा बागेच्या व्यवस्थापनासाठी आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी लाखो रूपये खर्च केलेले आहेत.
महत्वाच्या बातम्या: