Sadabhau Khot : कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा कोरोना मात्र अद्याप संपला नाही. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहेत. हा दरोडा लपवण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली. पीक विमा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अद्याप मिळाले नसल्याचे खोत म्हणाले. सध्या कांद्यांच्या दराचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकारने तातडीने कांद्याला 5 रुपयांचे वाहतूक अनुदान द्यावे अशी मागणीही खोत यांनी केली.


सरकार विरोधात जे बोलतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. सत्तेत असताना तुम्ही तुडवा, गाडा असे शब्द वापरता तुम्ही काय औरंगजेबचे अवलाद आहे का? असा सवाल खोत यांनी संजय राऊत यांना केला. सध्या सदाभाऊ खोत यांचे 'जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा' हे अभियान सुरु आहे. या अभियानाची सांगता येत्या 18 मे दिवशी  सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात होणार असल्याचे खोत म्हणाले.


सरकार सध्या बारामतीवरुन चालतय 


यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. मराठा आरक्षण देखील बारामतीकरानी घालवलं. राज्याचं वाटोळं या पवार अँड पवार कंपनीने केलं आहे.  राज्याला आता पवार यांच्यापासून वाचवण्याची वेळ आली असल्याचे खोत म्हणाले. हरबल गांजा देण्यासाठी मी शरद पवार यांना पत्र लिहले आहे. त्याबाबत मला आणखी उत्तर मिळाले नाही. पवार यांच्याकडे हर्बल गांजा फक्त नवाब मलिक यांच्यासाठी आहे का? असा सवालही खोत यांनी केला. 


सदाभाऊ खोत यांनी शेतकरी, बेरोजगार, प्रकल्पग्रस्त, कामगार, विद्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी 29 एप्रिलपासून सिंधुदुर्गातुन केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून खोत हे शेतकऱ्यांचे तरुणांचे, बेरोजगारांचे प्रश्न समजून घेत आहेत. तसेच या प्रशानवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान सुरु आहे.