मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे 2000 रुपये आज मिळणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. देशभरातील शेतकऱ्यांना 2 हजार रुपये तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे असे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम येथे होणाऱ्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
राज्यातील किती शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार?
केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान योजना 2019 च्या निवडणुकीपूर्वी सुरु केली होती. त्या योजनेद्वारे आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना यापूर्वी 4 हप्त्यांची रक्कम दिली गेली आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारच्या 'पी. एम. किसान' योजनेच्या १८ व्या हप्त्याचे आणि महाराष्ट्र राज्याच्या 'नमो शेतकरी महासन्मान'च्या पाचव्या हप्त्याची रक्कम वर्ग केली जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या वितरणाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सुमारे 91.53 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'पी.एम. किसान सन्मान निधी' व राज्याच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' या योजनांचे प्रत्येकी 2 हजार रुपये असे एकूण 4 हजार रुपये जमा होणार आहेत.
पीएम किसान सन्मान योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 17 हप्त्यांमध्ये 34 हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. देशभरात या योजनेतील पात्र शेतकऱ्यांची संख्या 9 कोटी 40 लाख इतकी आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वर्ग करण्यात येईल.
पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास योजनेतील पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळवायचे असल्यास ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. ई केवायसी करण्यासाठी शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तिथं ई केवायसी टॅबवर क्लिक करुन आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर फोनवर ओटीपी क्रमांक येईल तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यानंतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटसह पीएम किसानचं अॅप आणि नागरी सुविधा केंद्रात ई केवायसी करता येईल.
इतर बातम्या :
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा