Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी सारख्या बारमाही वाहणाऱ्या अनेक लहान, मोठ्या नद्या आहेत. मात्र सिंचनाची फारशी सोय नसल्याने मुख्य पीक म्हणून भात पिकालाच पसंती दिली जाते. त्यातच गेल्या काही वर्षात कापूस, सोयाबीन, मका पिकाचीही लागवड वाढली आहे. अशातच सिरोंच्यातील एका तरुण शेतकऱ्याने अनोखा प्रयोग करत गडचिरोलीच्या मातीत गेल्या तीन वर्षांपासून चक्क मोती पिकवतोय (Pearl Farming) रवी बोंगोनिवार असे त्या तरुण शेतकऱ्यांचे नाव आहे. कशी आहे मोत्याची शेती? जाणून घेऊया या सविस्तर बातमीमधून.
सिरोंच्यातील रवी बोंगोनिवार या तरुण शेतकऱ्याने 2015-16 मध्ये मत्स्यपालन व्यवसाय करण्यासाठी भुवनेश्वर येथील भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केंद्रीय संस्था येथे प्रशिक्षणासाठी गेला होता. तिथेच त्याने मोती संवर्धनाचे प्रशिक्षण घेतले आणि आपणही मोत्याची शेती करावी, अशी त्याची जिज्ञासा निर्माण झाली. त्याने स्वतःच्या शेतात 0.20 हेक्टर जागेत 30 बाय 30 मीटरचा खड्डा खोदून मत्स्यपालन आणि मोती संवर्धन सुरु केले आहे.
15 ते 16 महिन्यात दुप्पट उत्पादन, मोठा नफा
मोती संवर्धनासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याने त्याने लागवडीसाठी खोदलेल्या खड्ड्यात आठ फूट पाणी साठविले आहे. पाण्यातील चढ-उतार जाणून घेण्यासाठी 8 फूटावर पाण्याच्या बाटल्या बसविल्या आहेत. नळीच्या मदतीने मोती संवर्धनाच्या प्रक्रियेवर तो लक्ष ठेवतो. मोत्याच्या शेतीचा प्रयोग करताना पहिल्या वर्षी रवीने 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली. यात शिंपल्यांची खरेदी, जाळे यासंह विविध वस्तूंवर खर्च आला. मात्र 15 ते 16 महिन्यात त्याला दुप्पट उत्पादन मिळाले. त्यामुळे मागील 3 वर्षापासून रवी मोत्याची शेती करत असून यातून त्याला मोठा नफा मिळत आहे, असे तो सांगतो.
जिल्ह्यातील पहिलाच शेतकरी, इतरांनाहि प्रेरणा
उत्पादित केलेले मोती खासगी कंपनीच्या प्रतिनिधींना विकले जात असून कंपनीचे प्रतिनिधी मोती लागवडीसाठी सर्व साहित्य पुरवतात. प्रतिनिधी मोती लागवडीच्या पद्धतीचा आढावाही घेतात आणि आवश्यक सल्लाही देतात. उत्पादित झालेले मोती कंपनीकडूनच खरेदी केले जात असल्याने बाजारपेठेचाही विषय मिटला आहे. अनोखा असा हा प्रयोग करत मोत्याची शेती करणारा रवी बोंगोनीवार हा जिल्ह्यातील पहिलाच शेतकरी ठरला असून या तरुण शेतकऱ्याचा प्रयोग पाहून इतर शेतकरीही मोत्याच्या शेतीकडे वळतील यात शंका नाही.
ही बातमी वाचा: