Pasha Patel : स्व.गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत जुने सहकारी मित्र म्हणून राज्यभरात ओळख असलेले शेतकरी नेते पाशा पटेल यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. पाशा पटेल यांच्या माध्यमातून स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या सच्च्या मित्राला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे.


धनंजय मुंडे यांच्यात आणि पाशा पटेल यांच्यामध्ये कायमच गुरु -शिष्याचे नाते


पाशा पटेल हे याआधीही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात आणि पाशा पटेल यांच्यामध्ये कायमच गुरु -शिष्याचे नाते आजवर राहिलेले आहे. पाशा पटेल यांच्याशी असलेल्या या नात्याबाबत धनंजय मुंडे यांनी नुकतेच औसा (जि. लातूर) येथे एका भाषणात बोलून दाखवले होते. दरम्यान आज या नियुक्तीच्या माध्यमातून आपण पाशा पटेल यांना गुरुदक्षिणा दिली असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 


पाशा पटेल शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील


पाशा पटेल यांचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. बांबू लागवड, बांबूवरील संशोधन तसेच बांबू पासून विविध वस्तू निर्मिती याबाबतचा औसा येथील त्यांचा प्रकल्प मॉडेल आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून पाशा पटेल पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतील, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Dhananjay Munde : मला ज्या दिवशी जात सांगण्याची वेळ येईल त्याच क्षणी राजकारण सोडून देईल: धनंजय मुंडे