Navdurga 2025 : मूळच्या निफाड (Niphad) तालुक्यातील सोनगाव  येथील मयुरी नितीन काळे (Mayuri kale) या सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या करिअरची दमदार सुरुवात केली. लग्नानंतर त्यांनी काही काळ नोकरी (Job) केली, मात्र मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाला अधिक वेळ देण्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागली. पण मयुरी स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी इलेक्ट्रिक  व्हेइकल डिझाईनचा  कोर्स केला आणि त्यांना वार्षिक पाच लाख रुपयांचे पॅकेज असलेली चांगली नोकरी मिळाली. पण ती नोकरी स्वीकारायची झाल्यास कुटुंबापासून दूर पुण्यात राहावे लागणार होते. कुटुंबाची घडी विस्कटणार, या विचाराने जड अंत:करणाने त्यांनी ती संधी सोडली. 

Continues below advertisement


ज्यूस फार्म चालवण्याचा निर्णय (Mayuri Kale Success Story)


हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता, पण कुटुंबाच्या आनंदासाठी त्यांनी हा त्याग स्वीकारला. नेमक्या त्याच काळात, त्यांच्या पतीने एक  प्रस्ताव मांडला. नाशिकच्या (Nashik) कॉलेज रोडवरील  ‘ज्यूस फार्मच्या’ फ्रँचायजीची  जबाबदारी तू स्वीकारशील का, असे त्यांनी विचारले. व्यवसायाचा कोणताही अनुभव नसलेल्या मयुरींनी “एकदा करून पाहू” या सकारात्मक विचाराने हे आव्हान स्वीकारले. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी ज्यूस फार्म चालवायला घेतला. त्यांच्या मदतीसाठी पती होते, पण ज्यूस फार्म घेतल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांना कंपनीच्या कामानिमित्त इराणला जावे लागले. त्यामुळे सर्व धावपळ मयुरी यांना एकट्यालाच करावी लागली. त्या रात्री अकरा वाजेपर्यंत ज्यूस फार्म चालवायच्या. घर आणि ज्यूस सेंटर अशा दुहेरी जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पेलल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जर योग्य नियोजन केले तर कुटुंब सांभाळून आपण व्यवसायाचीही  जबाबदारी पेलू शकतो हे त्यांना समजले. 


मयुरी यांच्या प्रयत्नांना यश (Mayuri Kale Success Story)


मयूरी यांनी अत्यंत कमी वेळेत कामाचे नियोजन करणे, ग्राहकांना समजून घेणे आणि व्यवसायातील बारकावे आत्मसात केले. सुरुवातीला एका हेल्परच्या मदतीने त्या नव्या जोमाने कामाला लागल्या. मयुरी यांनी व्यवसायातला नफा वाढविण्यासाठी दोन गोष्टींवर भर दिला, त्यात पहिली, त्यांनी ज्यूस बनवण्याच्या पद्धतीत अचूकता आणली. दुसरी त्यांनी ग्राहकांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली. त्या ग्राहकांना ज्यूस किती आरोग्यदायी आहे हे समजावून सांगू लागल्या. त्यांच्या सेवेत सुधारणा झाल्याने एकदा जोडलेला ग्राहक पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे येऊ लागला व त्यांच्या व्यवसायात वाढ होऊ लागली. मयुरी यांच्या या प्रयत्नांना लवकरच यश आले. 


व्यवसाय सुरू केल्याचा मला अभिमान (Mayuri Kale Success Story)


ऑगस्ट 2024 पासून ज्यूस फार्मच्या नफ्यात वाढ व्हायला सुरवात झाली. आज या फार्ममधून दरमहा जवळपास 80 हजार रुपये निव्वळ नफा मिळतो. सुरुवातीला नोकरीची संधी गमावल्याची खंत वाटणाऱ्या या 28 वर्षांच्या युवा उद्योजिकेला  आता आपल्या निर्णयाचा अभिमान वाटतो. त्या म्हणतात, “मी व्यवसाय सुरू केला याचा मला अभिमान आहे. आणि माझ्या सारखी कोणतीही महिला हे करू शकते.” आज त्यांच्याकडे दोन माणसे कामाला आहेत आणि त्यांचा व्यवसाय व्यवस्थित स्थिर झाला आहे.आता त्या केवळ ज्यूस फार्मच सांभाळत नाहीत, तर वेळेचे योग्य नियोजन करून  त्यांनी ‘किचन कल्चर’च्या आउटलेटमध्ये भागीदारी करून नव्या व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. एका व्यवसायात यश मिळाल्यावर लगेच दुसर्‍या संधीकडे लक्ष देण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या महत्वाकांक्षेचे प्रतीक आहे. “संधी आली की सोडायची नाही” हे त्यांचे ब्रीद वाक्य बनले आहे. उच्चशिक्षित महिला, युवतींना कमी भांडवलात चांगला उद्योग उभारून,शेतकरी आणि ग्राहक यातील  दरी कमी करून, दर्जेदार पदार्थ ग्राहकांना पुरविण्याचे काम या माध्यमातून केल्याचे समाधान  मिळत असल्याचे मयूरी सांगतात . मयुरी  यांनी हे सिद्ध केले आहे की, कुटुंबाला प्राधान्य देतही प्रत्येक स्त्री आपल्या कौशल्यांचा वापर करून एक यशस्वी उद्योजिका होऊ शकते.



आणखी वाचा 


Navdurga 2025 : एक एकरापासून 22 एकरांपर्यंतचा प्रवास, मालती बनकर यांच्या कष्टाला सलाम, शेतीतील नवदुर्गेची यशोगाथा!