Navdurga 2025 : शहरात सरकारी नोकरी करणाऱ्या पती सोबत सुखाचे जीवन सहज शक्य असूनही मनीषा जाधव (Manisha Jadhav) आणि सविता जाधव (Savita Jadhav) या दोन महिलांनी शेतीच्या (Agriculture) मातीशी नाळ जोडली. कष्ट आणि एकत्रित कुटुंबाच्या बळावर त्यांनी केवळ शेती केली नाही, तर द्राक्ष निर्यातीचं (Grapes Export) स्वप्नही साकार केलं.

Continues below advertisement


मनीषा आणि सविता यांना प्रत्येकी दोन मुले आहेत. मनीषा यांचे पती एस.टी. महामंडळात तर सविता यांचे पती एम. एस. इ. बी. मध्ये नोकरीला आहेत. तिसरे दीर प्राध्यापक असून त्यांची पत्नी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. सासरेसुद्धा एस.टी. महामंडळात होते, मात्र अचानक हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी मनीषा यांचे पती अनुकंपा तत्वावर क्लार्क म्हणून नोकरीला लागले. घरातील सर्व पुरुष सरकारी नोकरीत असल्याने आर्थिक स्थैर्य होते, पण तरीही शेतीची जबाबदारी या दोन महिलांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. सोनारी येथे नातेवाईकांकडे ते एकदा सर्व कुटुंब द्राक्ष बाग पाहण्यासाठी गेले होते. 


2018 साली लावली द्राक्षबाग (Manisha Jadhav and Savita Jadhav Success Story)


त्या वेळी शिस्तीत लावलेल्या बागेचे फार अप्रूप वाटले. घरी आल्यावर त्यांनी सार्वमताने निर्णय घेतला व द्राक्ष बाग लावली. पण थोड्याच दिवसात म्हणजे 2022 मध्ये जेव्हा मनीषांच्या पतींना अनुकंपा तत्वावर मुंबई येथे नोकरी मिळाली, तेव्हा परिस्थिती फारच कठीण  होती. कारण 2018 साली  द्राक्ष बाग लावण्यात आली होती आणि त्याबाबत दोघींनाही फारसा अनुभव नव्हता. शेती करावी की नोकरी साठी बाहेर पडावे अशा संभ्रमात त्यांचे पती असताना. मनीषा यांनी ठामपणे त्यांना सांगितले, "तुम्ही निर्धास्तपणे नोकरीला जा, शेती कोणीच खोदून नेणार नाही, शेतीची सर्व जबाबदारी आम्ही सांभाळू."


द्राक्षबागेतून लाखोंचे उत्पन्न (Manisha Jadhav and Savita Jadhav Success Story)


ही वेळ कठीण होती, पण दोघींनी  जबाबदारी स्वीकारली. कधी मजूर मिळाले नाहीत तर स्वतः शेतात राबल्या. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन घेतले. हळूहळू द्राक्ष बागेचे काम त्या शिकत गेल्या आणि कष्टाच्या जोरावर द्राक्ष बाग फुलवली. त्या सांगतात – "कधी कधी एवढं काम  करायला लागायचं की अंग पूर्ण घामाने भिजून जायचं. पण आता एवढं सराव झालंय की थकवा जाणवत नाही." आज त्या द्राक्षबागेत पूर्णपणे पारंगत झाल्या आहेत. 2020 पासून त्या सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून द्राक्ष निर्यात करत आहेत आणि त्या कंपनीच्या सभासद देखील बनल्या आहेत. सुरुवातीला स्थानिक बाजारात द्राक्ष देणारे हे कुटुंब  गेल्या 6 वर्षापासून सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून द्राक्ष निर्यात करत आहे. नवल म्हणजे दोन्ही महिलांनी आपल्या मेहनतीच्या बळावर 2022-23 साली विक्रमी एकरी 12 टन माल तयार केला व 100 टक्के द्राक्ष निर्यात केले. आज त्यांच्याकडे 2.5 एकर थॉम्पसन व 1.5 एकर क्रिमसन आहे. एकूण 7 एकर क्षेत्र असून उरलेल्या शेतात सध्या फ्लॉवर आहे.गेल्या काही वर्षातील केलेली निर्यातीत त्यांची मेहनत दिसते. 2022 मध्ये 25.23 टनातून  18.16 लाख रुपये उत्पन्न मिळाले. 2023 मध्ये  29.44 टनातून 22.96 लाख रुपये, 2024 मध्ये 15.50 टनातून 13.48 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले. तर 2025 साली 20.38 टनातून 16.70 लाख रुपये इतके उत्पन्न झाले.


जाधव कुटुंब कृषिक्षेत्रात प्रगत (Manisha Jadhav and Savita Jadhav Success Story)


बऱ्याच वेळा लोक त्यांना म्हणतात की – "सर्व लोक नोकरीला आहेत, मग एवढी मेहनत कशाला?" तेव्हा ‘लेडी जय-वीरू’ची जोडी हसून उत्तर देते – "कष्टाला पर्याय नाही. त्यांच्या बागा पाहण्यासाठी आता तालुक्यातील लोक येतात आणि मार्गदर्शन घेतात. या कुटुंबाची खरी ताकद म्हणजे, त्यांचं एकत्र कुटुंब. घरातील तीनही पुरुष सरकारी नोकरीला आहेत. पण त्याचबरोबर महिलांनाही संधी देण्यात आली. जाऊबाईंना शिकण्याची पूर्ण मुभा दिली आणि त्या आज सरकारी शिक्षिका आहेत. खरं तर या दोन्ही महिला आपल्या पतींसोबत  शहरात जाऊन आरामशीर आयुष्य जगू शकल्या असत्या. पण त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. त्यांचा विश्वास आहे – "एकत्र राहिलं की ताकद वाढते, आर्थिक उन्नती होते आणि कुटुंब भक्कम बनतं." आज जाधव कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत, आणि कृषिक्षेत्रात प्रगत झाले आहे. हे शक्य झाले ते मनीषा आणि सविता यांच्या कल्पकता, मेहनत आणि त्यागामुळे.



आणखी वाचा


Navdurga 2025 : नोकरीला रामराम करत व्यवसायाचा श्रीगणेशा, आज बनली लाखोंचा नफा कमावणारी उद्योजिका; शेतीतील नवदुर्गा मयुरी काळे यांची यशोगाथा!