Nashik Success Story: मधमाश्यांचा आवाज ऐकला की बहुतांश लोक घाबरून पळ काढतात, पण नाशिकचे गजानन भालेराव मात्र या आवाजाकडे धावत जातात. कारण गजानन गेली 18 वर्षं मधमाश्यांचे पालन करत आहेत आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाबरोबरच हजारो शेतकऱ्यांना फायदा करून देत आहेत.
हिंगोली येथे जन्मलेले गजानन सुरुवातीला शेतकरी कुटुंबात वाढले. नंतर रोजगारासाठी ते नाशिकमध्ये आले. आज त्यांचा किसान मधुमक्षिका फार्म्स या नावाने ओळखला जाणारा व्यवसाय देशभर पसरला आहे. त्यांची पत्नी माधुरी भालेराव या या प्रवासात खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. त्या मध काढण्यापासून ते त्याचे प्रक्रिया करून बाजारात विक्री करण्यापर्यंतची जबाबदारी सांभाळतात.
पिकानुसार प्रवास ,भारतभर फिरते भालेराव दाम्पत्य
भालेराव दांपत्याचा व्यवसाय स्थिर नाही; तो पिकांनुसार प्रवास करणारा आहे. त्यांच्या ताफ्यात 500 हून अधिक मधमाश्यांच्या पेट्या, एक तंबू, काही भांडी आणि आवश्यक साधनं नेहमी ट्रकमध्ये सज्ज असतात. पिकं बदलली की हे कुटुंब नवे शेत गाठतं. सध्या ते नाशिकच्या मालेगाव परिसरातील बाजरीच्या शेतात काम करत आहेत. यानंतर ते महाराष्ट्रातील डाळिंब व पेरूच्या शेतांमध्ये आणि पुढे राजस्थानातील सेलरीच्या शेतात पेट्या ठेवतात. हिवाळ्यात मात्र त्यांचा मुक्काम राजस्थान व उत्तर प्रदेशातील विस्तीर्ण मोहरीच्या शेतात असतो. भालेराव सांगतात, “मधमाश्यांमुळे परागीकरण झालं की शेतीचं उत्पादन किमान 50 टक्क्यांनी वाढतं. हे शेतकऱ्यांसाठी सोन्याहून पिवळं आहे.”
अखेर 2007 मध्ये व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय
16 व्या वर्षी ट्रक ड्रायव्हिंग करताना गजानन राजस्थानात गेले होते. तेव्हा त्यांनी प्रथम रस्त्याच्या कडेला मधमाश्यांच्या पेट्या पाहिल्या. त्याच क्षणी त्यांच्या मनात मधमाशी पालनाची बीजं रुजली. त्यानंतर त्यांनी खादी व ग्रामोद्योग आयोग आणि केंद्रीय मधमाशी संशोधन संस्था, पुणे येथे प्रशिक्षण घेतले. अखेर 2007 मध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
आज भालेरावांचे काम केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नाही. गेल्या 18 वर्षांत त्यांनी 80000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना परागीकरणाद्वारे फायदा करून दिला आहे. नाशिकमधील नीलेश पवार यांसारखे अनेक शेतकरी सांगतात की, “जर भालेराव यांच्या मधमाश्या नसत्या तर आम्हाला डाळिंबाचं उत्पादन आणि निर्यात शक्य झाली नसती.”
कठोर परिश्रम व युरोपियन प्रेरणा
भालेराव यांच्याकडे सध्या जवळपास 1000 पेट्या आहेत. प्रत्येक पेटीत 14 ते 16 हजार मधमाश्या असतात. त्या दररोज सरासरी 11 तासांहून अधिक परिश्रम करतात. ही कार्यशैली भालेरावांना नेहमी प्रेरणा देते. त्यांचा विश्वास आहे की, “जर तुम्हाला खरोखर मधमाश्यांचं महत्त्व समजलं, तर हा व्यवसाय केवळ नफा देणारा नाही, तर पर्यावरणासाठीही अमूल्य आहे.”गजानन भालेरावांची कहाणी म्हणजे एक शेतकरी कुटुंबातून जागतिक पातळीवर विचार करणाऱ्या उद्योजकापर्यंतचा प्रवास. मेहनत, दूरदृष्टी आणि निसर्गाविषयी आदर असेल, तर मधमाश्यांसोबत यशोगाथा लिहिता येते, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं आहे.