Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने भरडला जात आहे. शहादा तालुक्यातील करंजाई परिसरात वीजतारांची चोरी आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटनांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिसरातील दहा ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि 20 ते 22 खांबावरील विजांच्या तारांची चोरी झाली आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.


ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि विजेच्या तारांच्या चोरीने शेतकरी हतबल 
नंदुरबार जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरिपाचा हंगाम गेला आहे. आता शेतकऱ्यांची आशा लागून आहे ती रब्बी हंगामावर. मात्र चोरट्यांनी शेतशिवारातील शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि विजेच्या खांबावरील तारा चोरुन नेल्या आहेत. त्यासोबत पाच महिन्यात दुसऱ्यांदा ट्रान्सफॉर्मरमधील ऑईलची चोरी झाली आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत मात्र चोरट्यांचा तपास लागलेला नाही. तर दुसरीकडे विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांकडे वीज बिल भरण्याचा तगादा लावत आहे. आता शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर काढून ऑईल भरण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडे दिले आहेत. शेतकऱ्यांना ते ट्रान्सफॉर्मर कधी मिळतील हा एक प्रश्न आहे. ते ट्रान्सफॉर्मर मिळाल्यावरच शेतकरी रब्बी पिकांचे नियोजन करु शकतो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.


एकीकडे अस्मानी संकटाचा दणका सहन करत असताना चोरीच्या घटनांची सुलतानी संकटे शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहेत. ऑईल चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन तिला जेलबंद करण्याची मागणी आता शेतकरी करु लागले आहेत. आता पोलिसांनीही बळीराजाला अडचणीत आणणाऱ्या चोरांना अद्दल घडवावी हीच अपेक्षा आहे.


धुक्यामुळे नंदुरबारमधील कांदा, मिरची पिकाला फटका 
नंदुरबार जिल्ह्यात परतीचा पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता पावसानंतर जिल्ह्यात अनेक भागात दाट धुके दिसून येत आहे. त्यामुळे कांदा, मिरची पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. धुके पडल्यानंतर कांद्याच्या पातीवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू जमा होऊन होऊन सडून खराब होत असते तर मिरचीवर दवबिंदू जमा होऊन डाग पडून प्रतवारी कमी होत असते. याशिवाय धुक्यामुळे कापसाचे फुल फुगडी गळत असून जवळपास खरीप हंगामातील सर्वच पिकांना कमी जास्त प्रमाणात याचा फटका बसून उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.