Nandurbar Agriculture News : राज्यातील अनेक जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी (Rain) झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्याला देखील परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. या पावसातूनही काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. सध्या काही ठिकाणी कापूस (Cotton) काढणीला आला आहे. तर काही ठिकाणी कापसाची काढणी सुरु आहे. मात्र, या वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा आहे. तर दुसरीकडं मजुरांअभावी कापूस वेचणीत खोडा येत आहे.
शेतकऱ्यांसमोर कापूस चोरीची मोठी समस्या
नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. त्यासोबतच कापसाला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळं यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडं कल दाखवला होता. कापसाची मोठ्या प्रमाणात लागवडही केली होती. आता कापूस वेचणीला आला आहे. मात्र, शेतकऱ्यांसमोर कापूस चोरीची मोठी समस्या उभी राहिली आहे. कापसाला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळं चोरट्यांनी आता आपला मोर्चा कापूस चोरीकडे वळवला आहे. चोरट्यांच्या टोळ्या रात्री शेतात घुसून कापूस वेचून घेऊन जात आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडं मजूर मिळत नसल्यानं वेळेत कापसाची वेचणी होत नाही. हेच चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे.
रोजगाराच्या शोधात मजुरांचे स्थलांतर
रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणात मजुरांनी गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये स्थलांतर केले आहे. त्यामुळं स्थानिक मजूर नसल्यानं शेतकऱ्यांना 40 ते 45 किलोमीटरवरुन मजूर आणावे लागत आहेत. त्यातच मंजुरांच्या वाहतुकीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. यामुळं जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, कापूस चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मजूर टंचाईमुळं कापूस वेचणी वेळेवर होत नसल्यानं हे चोरट्यांच्या पथ्यावर पडले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. किरकोळ कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केवळ शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करावा अशी अट प्रशासनाने घालून द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामात कापसाच्या खालोखाल मिरचीची लागवड केली जाते. परतीच्या पावसामुळं कापूस आणि मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरची आणि कापूस पावसात सापडल्यानं कापसाची काढणी आणि मिरचीची तोडणी करणं शेतकऱ्यांना क्रम प्राप्त आहे. त्यात मजूर मिळत नसल्यानं पावसात सापडलेली मिरची आणि कापूस खराब होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: