Agriculture News :  दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाच्या रिस्पेशनचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, खासदार राहुल गांधी यांच्यासह देशातील सर्वच पक्षांचे बडे उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक तरुण चर्चा करातानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा तरुण नेमका कोण आहे? त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती पाहुयात.

Continues below advertisement

तर रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिस्पेशनचा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव मिथिलेश हरिश्चंद्र देसाई असं आहे. ते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे या गावातील रहिवासी आहेत. फणसकिंग असी त्यांची ओळख आहे. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिस्पेशन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी मिथिलेश देसाई यांची भेट घालून दिली. शरद पवार यांनी मिथिलेश यांना बोलावून त्यांच्या कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. त्यानंतर मिथिलेश देसाई आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 12 मिनीटे चर्चा झाली. याबाबत एबीपी माझाने थेट मिथिलेश देसाई यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.  

12 मिनीटांमध्ये फणसकिंग मिथिलेश देसाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझी जवळपास 12 मिनीटे चर्चा झाली. ज्यावेळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ गेलो त्यावेळी त्यांनी कुठुन आलेत? तुम्ही काय करता? असे विचारले. त्यानंतर मी कोकणातून आलो आहे. फणसाच्या शेतीत वडिलांनी सुरु केलेलं काम मी पुढे नेत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याचे मिथिलेश देसाई म्हणाले. 

Continues below advertisement

फणसापासून तयार केलेल्या बायप्रोडक्टची माहिती पंतप्रधानांना दिली

या भेटीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फणसापासून तयार केलेल्या बायप्रोडक्टची माहिती दिली. यामध्ये फणसांच्या कच्च्या गरांपासून तयार केलेली पावडर दाखवली. ही पावडर मधुमेहासाठी ओषधी गुणधर्म म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर फणसाच्या बियामध्ये प्रोटीन असते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फणसापासून तयार केलेले चिप्स देखील दिले. त्याचबरोबर फणसाच्या सालीपासून तयार केलेली बॅग आणि पासपोर्ट होल्डर देखील पंतप्रधानांना भेट दिल्याची माहिती मिथीलेश देसाई यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आगामी काळ 'फणस वर्ष' (Jackfruit Year) म्हणून घोषित करण्याची आणि फणसाला राष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन देण्याची आग्रही मागणी देखील केली आहे.

 शरद पवार यांच्यामुळेच माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली

या भेटीबाबत बोलताना मिथिलेश देसाई यांनी सांगितले की, माझ्या झापडे गावाला, लांजा तालुक्याला, रत्नागिरी जिल्ह्याला व आपल्या महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट म्हणजे ईथेल्या फणस शेतीबद्दल देशाच्या पंतप्रधान ह्यांच्या समोर मांडण्याची संधी मिळाली. शरद पवार साहेब गेल्या कित्येक वर्षापासुन आपलं काम बघत आले आहेत. त्यांनी मला शेतीसाठी कायमच अमूल्य मार्गदर्शन दिल्याचे देसाई म्हणाले. शरद पवार यांच्यामुळेच माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्याचे देसाई म्हणाले. 

मिथिलेश देसाई यांच्या शेतात तब्बल 88 प्रकारचे फणस 

मिथिलेश देसाई यांचे शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठामधून झालं आहे. ते अॅग्रीकल्चर इंजिनीयर आहेत. त्यांच्या शेतात जगभरातील 128 फणसाच्या वाणांपैकी त्यांच्या शेतात तब्बल 88 प्रकारच्या फणासाचे वाण असल्याची माहिती देसाई यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यामुळं दुर्लक्षीत झालेले पिक समोर आले. 

महत्वाच्या बातम्या:

Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?