(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Unseasonal Rain: तिसऱ्या अवकाळी पावसाने 14 जिल्ह्यातील 28 हजार हेक्टर पिकांचं नुकसान, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान
गुढीपाडव्याच्या दिवशी 15 ते 21 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 30 जिल्ह्यांमध्ये तब्बल 1 लाख सात हजार हेक्टरी पिकांच नुकसान झाले आहे.
Unseasonal Rain: तिसऱ्या अवकाळी पावसाने 14 जिल्ह्यातील 28 हजार हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं आहे.. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले आहे. नाशिक जिल्ह्यात आठ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात 7 हजार 305 हेक्टरवर नुकसान झालंय. अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच मका, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
अवकाळी पावसाच्या पहिल्या टप्प्यात 4 ते 9 मार्च दरम्यान झालेल्या गारपीटीने 15 जिल्ह्यांमध्ये 38 हजार 606 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालं होतं. त्यानंतर 15 ते 21 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 30 जिल्ह्यांमध्ये तब्बल 1 लाख सात हजार हेक्टरी पिकांच नुकसान झाले आहे. तर आता तिसऱ्या अवकाळी पावसामध्ये 28 हजार 287 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं अंदाज कृषी विभागाला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले?
रत्नागिरी | 45 हेक्टर |
रायगड | 50 हेक्टर |
सिंधुदुर्ग | 37 हेक्टर |
नाशिक | 8003 हेक्टर |
धुळे | 29 हेक्टर |
जळगाव | 53 हेक्टर |
पुणे | 3 हेक्टर |
अहमदनगर | 7305 हेक्टर |
सातारा | 47 हेक्टर |
बीड | 2762 एकर |
धाराशिव | 2856 हेक्टर |
बुलढाणा | 114 हेक्टर |
अकोला | 5859 हेक्टर |
नागपूर | 7 हेक्टर |
कोकणात आंबा, काजू पिकाला मोठा फटका
कोकणातही अवकाली पावसानं हजेरी लावली आहे. तळकोकणात सलग दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कोकम, जाभूळ पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने जाभूळ गळून मातीमोल झाली आहेत. तर आंब्यातही पावसामुळे जंतू तयार होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यातील आंबा बागायतदार चिंतेत आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तर शेती नुकसानीचे प्राथमिक अंदाज आमच्याकडे आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील अवकाळी पावसाचा आढावा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवरील उपाययोजनांबाबत आज मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथी गृह येथे ही बैठक पार पडणार आहे. एक वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलेला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि अधिकारी उपस्थित असणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :