Solapur Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना (agricultural crops) मोठा फटका बसला आहे. त्यामुळं राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. सोलापूर (Solapur)जिल्ह्यातील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात गारपीट झाली आहे. यामुळं रब्बीच्या पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. 


द्राक्ष बागांना मोठा फटका


माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील गोरडवाडी, इस्लामपूर ,कन्हेर, सरगरवाडी, मांडकी, भांब, रेडे, भांबुर्डी या भागात झालेल्या अवकाळी गारपिटीमुळं हातात आलेले पिकं आणि बागांचं मोठं नुकसान झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर परिसरात गारांचा पाऊस झाल्यानं द्राक्ष बागांचे घड गाळून पडले आहेत. या गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं कंबरडे मोडले आहे. तयार झालेल्या द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसल्यानं लाखो रुपये खर्चून हाती आलेले पीक या गारपिटीमुळं उध्वस्त झालं आहे.


हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठं नुकसान 


माळशिरस तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण होते. अधून मधून अवकाळी पावसाच्या लहानशा सरी कोसळत होत्या. काल अचानक गारांसह पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी वर्गाची एकच धांदल उडाली आहे. सध्या शेतकऱ्यांची मका, गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांच्या मळणीसाठी लगबग सुरु आहे. अशातच हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या भागातील आंबा, द्राक्षसह, तोंडले इतर फळबांगाचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच शेती मालाला भाव नसल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे. अशातच अतोनात मेहनत घेऊन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे गारपीटीमुळं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. प्रशासनाने या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.



अवकाळी पावसामुळं मराठवाड्यातही नुकसान


मराठवाड्यातही (Marathwada) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.  काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) करंजखेड आणि पिशोर परिसरात गारपीट पाहायला मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरसह लातूर, हिंगोलीसह परभणी जिल्ह्यात देखील आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 


हिंगोली


हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज आणि खरबूज यासह आंब्याच्या बागा असलेल्या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. शेतातील गहू, ज्वारी, टरबूज यासह हरभरा ही पिकं आता काढणीला आली होती. परंतू जोरदार झालेल्या गारपिटीमुळं शेतातील या पीकांना फटका बसला आहे. 


परभणी 


परभणी जिल्ह्यातील मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पुर्णा, सेलु तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. तर गंगाखेड, सेलु, सोनपेठ तालुक्यात गारपीट झाल्याने काढलेले आणि काढणीसाठी आलेल्या गहू, ज्वारी या पिकांसह टरबूज, खरबूज, आंबा, मोसंबी आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Marathwada Rain: मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान