Ajit Nawale : हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्राला 29 मे पर्यंतची मुदत आहे. मात्र, उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं नाफेड आणि एफसीआय या एजन्सीच्या माध्यमातून नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात खरेदी केल्या जाणाऱ्या हरभऱ्याची खरेदी अचानकपणे 23 मे रोजी थांबवली आहे. यावरुन किसान सभा (Kisan sabha) आक्रमक झाली आहे. अचानक हरभरा खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे.  त्यामुळं केंद्र सरकारनं हरभरा खरेदी पुन्हा सुरु करावी, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेने दिला आहे.

  
हरभरा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं कारण पुढे करुन दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले. राज्यात नाफेडद्वारे 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात 4 हजार 200 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता. नाफेडकडे रीतसर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस.एम.एस. पाठवण्यात आले होते. रीतसर एस.एम.एस. आलेल्या शेतकऱ्यांनी वाहने भाड्याने करुन आपला माल खरेदी केंद्रांवर आणला असताना आता खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण सांगून खरेदी नाकारली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. 23 मे रोजी अचानक खरेदी बंद झाल्यामुळे केंद्रांवर आणलेल्या मालाचे काय करायचे असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिल्याचे अजित नवले म्हणाले. 


केंद्र सरकारने हरभरा खरेदी पुन्हा सुरु करावी, राज्य सरकारनेही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेने दिला आहे. त्यामुळेआता किसान सभेच्या इशाऱ्यानंतर सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
 


महत्वाच्या बातम्या: