Food Production : भारत अन्न उत्पादनात (Food Production) स्वयंपूर्ण असून, जगातील मोठ्या भागाची अन्नाची गरज भागवण्याची क्षमता असल्याचं मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी व्यक्त केलं. भविष्यातील गरजा आणि आव्हानं लक्षात घेऊन देश धोरणात्मक योजना आखत पुढे जात आहे. अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचं असेल तर उत्पादकताही वाढवावी लागेल, याची आम्हाला जाणीव असल्याचे तोमर म्हणाले. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या 'लीड्स 2022' परिषदेला संबोधीत करताना तोमर बोलत होते. 


कृषी निर्यातीने 4 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला


शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करुन त्यात शेतकर्‍यांना सहभागी करुन घेतले पाहिजे. चांगल्या सिंचन पद्धतीमुळं कृषी उत्पादन खर्च कमी केला तर अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता वाढेल असेही तोमर म्हणाले. सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि आपल्याला देश आणि जगात अन्नसुरक्षा आणण्यात सहभागी होता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना महामारी असूनही, भारताच्या कृषी क्षेत्राने 3.9 टक्के विकास दराची लक्षणीय कामगिरी नोंदवली. तसेच, आपल्या कृषी निर्यातीने 4 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, जो आपल्याला सतत वाढवायचा असल्याचे तोमर म्हणाले. 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या सुमारे 900 कोटी असेल, अन्नाची मागणी झपाट्याने वाढणार आहे. परिणामी शेतजमीन, पशुधन आणि खते आणि जनुकीय सुधारित पिकांसाठी चराऊ जमीन यांची मागणी वाढेल, असे तोमर पुढे म्हणाले.


जगात सर्वाधिक पीक घनता भारतात


आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अन्न उत्पादक देश म्हणून उदयास आलो असल्याचे तोमर म्हणाले. भारताचा भूगोल, हवामान आणि माती खूप वैविध्यपूर्ण आहे. नैसर्गिकरित्या कृषी मालाच्या विस्तृत जातींचे, वाणांचे उत्पादन करण्यासाठी ही स्थिती उत्कृष्ट असल्याचे तोमर म्हणाले. आपण इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा जास्त पिके घेऊ शकतो, जगात सर्वाधिक पीक घनता भारतात आहे. चौथ्या तात्पुरत्या अंदाजानुसार, 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.72 मेट्रिक टन आहे.


लहान शेतकऱ्यांच्या वाढीसाठी काम सरकारचे काम सुरु


भारताला स्वावलंबी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी सरकार लहान शेतकऱ्यांच्या वाढीसाठी सतत काम करत आहे. अन्न प्रक्रियेसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना पुढील 6 वर्षात 10 हजार 900 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनासह लागू केली गेली आहे. त्याचवेळी कृषी उडान योजनेंतर्गत हवाई वाहतुकीद्वारे कृषी उत्पादनांची ने आण करण्यासाठी सहाय्य आणि प्रोत्साहन दिले जात आहे. विशेषतः ईशान्य आणि आदिवासी भागांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती तोमर यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या:


Narendra Singh Tomar : कृषी क्षेत्रात बळकटी आणण्याची गरज, खासगी-सार्वजनिक भागीदारी हे शेतीच्या विकासासाठी आदर्श मॉडेल : कृषीमंत्री