Solapur Rain : सध्या राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे मात्र, अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, माळशिरस या तालुक्यात आज पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस आल्यानं द्राक्ष, आंबा आणि डाळिंब या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 


दरम्यान, वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात पाऊस झाल्याने ऐन उन्हाळ्यात पावसाळा असल्यासारखे जाणवत होते. तर सोलापूर शहरातही पावसाने हजेरी लावली. सोलापूरमध्ये रात्री 1  वाजल्यापासून विजांच्या कडकडटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतकरी मात्र चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. या पावसामुळे द्राक्ष, आंबा आणि डाळिंब पिकावर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली आहे.


सांगली शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसासोबत जोरदार वारा सुटलेल्या रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. होती. तसेच मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सांगलीत मोठमोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने सांगली-तासगाव रोडवरील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. सांगली-तासगाव रोडवरील माधवनगर हद्दीतील रस्त्यावर  2 मोठी झाडे पडली आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर अहमदनगरमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेरमध्ये वीज पडून तीन जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.


हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान गर्जना व विजांच्या कडकडाटासह हिंगोली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दोन तास अवकाळी पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिजवून टाकलेल्या हळदी या पावसामुळे भिजण्याची शक्यता आहे. रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. पहाटे झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका मालवणमधील दांडी समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन नौकांना बसला आहे.