Dhule kharif sowing : सध्या राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात जुलै महिना उजाडला तरी अद्याप अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्या न करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 50 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. चांगला पाऊस जर झाला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊ शकते. त्यामुळं शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.


पेरणीच्या कामाला वेग


धुळे शहरासह जिल्ह्यात हवामान विभागाने यंदा सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, त्यानंतर गडप झालेल्या पावसानं अद्यापही दमदार हजेरी लावलेली नाही. पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पहिल्या एक ते दोन पावसाच्या आशेवर पेरण्या केल्या आहेत. धुळे जिल्ह्यात कपाशीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. गेल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 31 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. तसेच गेल्या आठवड्यात बुधवारपासून पावसानं काही प्रमाणात हजेरी देखील लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळं जिल्ह्यात यापुढे दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला आहे.


आतापर्यंत 90 मिलिमीटरहून अधिक पाऊस


धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 50 टक्के हून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्या तरी अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. पुढील आठ ते पंधरा दिवसात 80 टक्के क्षेत्रावर पेरण्या होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 90 मिलिमीटरहून अधिक पावसाची हजेरी लागली असली तरी यातील सर्वाधिक पाऊस शिरपूर तालुक्यात झाला आहे. शिरपूर तालुक्यात 199.3 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद शिंदखेडा तालुक्यात झाली असून, साक्री आणि धुळे तालुक्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.


दुबार पेरणीचे संकट


धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची दरवर्षी हजेरी लागत असते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण पाहायला मिळते. यंदा देखील समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.