Farmers Electricity Connection : उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल (15 मार्च) विधिमंडळात शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याची घोषणा केली होती. पुढील तीन महिने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी केली आहे, त्यांची तत्काळ जोडणी करावी असे निर्देशही देण्यात आले होते. दरम्यान, या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरु झाली आहे. जिल्हा पातळीवरच्या महावितरणच्या कंपन्यांना 'स्टॉप' असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे.
जिल्हा पातळीवरच्या महावितरणच्या कंपन्यांना 'स्टॉप' असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. तसेचं या पत्रामध्ये रिकनेक्ट असाही आदेश देण्यात आहे. पुढच्या तीन महिन्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी शेतकर्यांची वीज जोडणी तोडण्याचं काम थांबवण्याची घोषणा विधिमंडळात केली आहे. त्यामुळे तूर्तास तरी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सभागृहात काय म्हणाले होते उर्जामंत्री नितीन राऊत
ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडणी केली आहे, त्यांचा वीजपुरवठा पुर्ववत केला जाणार असल्याचे वक्तव्य उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले. तसेच शेतकऱ्यांच्या हातात पुढचे पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडीत केला जाणार नसल्याचं राऊत यांनी सभागृहात सांगितलं. वीज तोडणीच्या मुद्यांवरुन सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला होता.
शेतकऱ्यांना प्राथमिकता देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पिक येईपर्यंत पुढचे तीन महिने वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवत आहोत असे राऊत म्हणाले. दरम्यान, या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसंनी केली होती टीका
शेतकऱ्यांबाबत ठाकरे सरकारला कोणतीही संवेदना नाही. मागील अधिवेशनात दिलेलं आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलं नसल्याचे फडणवीस म्हणाले. हे सरकार सावकारी आणि सुलतानी पद्धतीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी करत आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवत राहू असेही फडणवीस यावेळी म्हणाले होते. मागील अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट घोषणा केली होती की, मे महिन्यापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज तोडणी केली जाणार नाही. मग त्यांनी दिलेलं आश्वासन का पूर्ण होत नाही? असा सवाल फडणवीस यांनी केला होता. तसेच ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं वीज कट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.