Ajit Pawar : पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं. हा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचेही पवार म्हणाले. अजित पवार हे सध्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भातील (Vidarbha) जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी नागपूरमध्ये (Nagpur) प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करुन द्या
अतिवृष्टीनं शेतकरी व्याकूळ झाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत ही गंभीर स्थिती असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं पूरग्रस्त भागात तत्काळ मदत मिळणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणांची आवश्यकता आहे, ते त्यांना उपलब्ध करुन दिलं पाहिजे. या समस्यांवर तर कोणी बोलतच नसल्याचं अजित पवार म्हणाले.
मृत जनावरांच्या बाबतीतही मदत देणं गरजेचं
मी राजकारण करण्यासाठी हा दौरा करत नाही. विरोधकांची भूमिका महत्वाची असते. या दौऱ्याच्या माध्यमातून दुसऱ्यांनी निवेदन देऊन त्यावर आपण बोलणं आणि आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आपल्याला त्यातील बारकावे समजतात. ते प्रश्न सभागृहात चांगल्या पद्धतीनं मांडता येतात असेही अजित पवार म्हणाले. अडचणीतील माणसाला मदत होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. अतिवृष्टीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत करण्यात आली आहे. मात्र, मृत जनावरांना, पाळीव जनावरांना त्यांना मात्र, मदत दिली नसल्याचे अजित पवार म्हणाले. त्यांना देखील मदत मिळणं गरजेचं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. आज मी याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितले.
आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदत नाही
या दौऱ्यानिमित्त स्थानिक कार्यकर्ते भेटत आहेत. निवडणुका असल्यावरच कार्यकर्त्यांनी भेटावं असे काही नाही. जेव्हा केव्हा निवडणुका लागतील त्याआधी प्रत्येक पक्षाची तयारी असलीच पाहिजे असे देखील अजित पवार म्हणाले. आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदत नाही. आधीच विहीर खोदून ठेवतो असेही ते म्हणाले. वेगवेगळ्या समस्या घेऊन लोक भेटत आहेत. तसेच काही लोकांवर नवीन जबाबदारी सोपवली आहे. ते लोक देखील भेटी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या: