Yavatmal Rain : राज्यातील काही जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. यवतमाळ जिल्ह्यात काल दुपारपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा पहाटेपासून हजेरी लावली आहे. जिल्ह्यात पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. 11 ते 13 जुलैपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. अती पावसामुळं वणी, राळेगाव, झारीजामनी, घाटंजी, बाभूळगाव, तालुक्यातील जवळपास 450 ते 500 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसानं झालं आहे. 


कपाशी, तूर, सोयाबीन या पिकांना फटका


यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, मारेगाव, वणी कळंब, बाभूळगाव या तालुक्यातील नदी नाल्यांच्या काठावरील शेतातील पिकं पुरामुळं खरवडून गेली आहेत. मागील आठवडाभरापासून पावसाची जोरदार हजेरी सुरु होती. अशातच 12 ते 15 तासाच्या उघडीनंतर पुन्हा पावसानं जोर पकडला आहे. राळेगाव-वारा या रोडवरील पुलावरुन पाणी जात असल्यानं वारा या गावचा संपर्क तुटला आहे. तर घाटंजी तालुक्यातील इरुळ-कवठ पुलावरुन पाणी वाहत आहे. अती पावसामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. सुरुवातीला समाधानकारक झालेल्या पावसानं बळीराजा सुखावला होता. मात्र सतत पावसाची रिपरिप सुरु असल्यानं कपाशी, तूर, सोयाबीन, पिकांना फटका बसला आहे. 




नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन


पावसामुळे डवरणी, खुरपणी, निंदनं आदी शेतीची कामं खोळंबळी आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पाऊस चालू असताना नागरिकांनी नदी नाल्यांच्या काटावर, बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. मुसळधार पावसामुळं राज्यात काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम  या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यातील, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होत आहे. तसेच नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागासह मुंबई, ठाणे पालघर या भागातही पाऊस पडत आहे.


महत्वाच्या बातम्या: