Heavy Rain in Latur : लातूर जिल्ह्यात मागील चार दिवस झालेल्या मान्सून पूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले आहे. जोरदार वारं आणि ढगाच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे फळबागेच नुकसान मोठ्या प्रमाणात झाला आहे. मागील चार दिवसांमध्ये नऊ जनावर आणि एका व्यक्तीचा मृत्यू वीज पडून झाला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका निलंगा तालुक्याला बसला आहे.


वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस


लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मुगाव, हनुमंतवाडी या गावत ग्रुप शेती केली जाते. ग्रुप शेतीच्या माध्यमातून 12 एकरच्या आसपास पपई ची लागवड करण्यात आली होती. वीस दिवसांपूर्वी पाण्याच्या कमतरतेमुळे टँकरद्वारे पपईच्या बागेला पाणी देण्यात येत होतं. मात्र मागील चार दिवसापासून या भागातील चित्र बदलून गेला आहे... चार दिवसापासून जोरदार वारं ढगांचा गडगडात वीज पडून पावसाला सुरुवात झाली आहे. याचा फटका पपईच्या बागेला बसला आहे. पपईची बाग हे एक उदाहरण झालं मात्र या भागातील केळी द्राक्ष आंबा यासारख्या फळबागेला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. 


एकाच पावसात 13 लाखांची बाग भुईसपाट 


हनुमंतवाडी गावातील विठ्ठल जाधव आणि त्यांच्या काही सहकारी मिळून ग्रुप शेती केली. नियोजन आणि मोठा खर्च करत 12 एकरवर पपईची बाग उभी केली. काही दिवसांमध्येच पपईचे उत्पन्न सुरू होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. पाण्याच्या कमतरतेमुळे टँकरद्वारे पाणी देत त्यांनी पपईची बाग जगवली. मात्र मागील चार दिवस सातत्याने संध्याकाळी जोरदार पाऊस हजेरी लावू लागला. पपईच्या बागेत प्रत्येक झाडाची पाने गळून पडू लागली. पाऊस आणि जोरदार वारा यामुळे पपईची बाग आडवी झाली. पपईला आता उत्पन्न येणं शक्यच नाही. अपेक्षित 12 ते 15 लाखाचे उत्पन्न या पावसाने शून्य केलं. ही बाग लागवडीपासून आतापर्यंत पाच ते सहा लाखाचा खर्च झाला तो वेगळाच आहे. खर्चही न निघता नुकसान झाल्यामुळे ग्रुप शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं अर्थकारण अक्षरक्ष: मातीमोल केलंय. पपईच्या या शेतीवर आता नांगर फिरवल्याशिवाय शेत रिकाम होत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याची, उद्विग्न भावना शेतकरी विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केली आहे.


चार दिवसात वीज पडून एकाचा मृत्यू तर, नऊ जनावरे दगावली


लातूर जिल्ह्यात मागील चार दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने मोठे आर्थिक नुकसान तर केल आहे, तसेच जीवित हानी ही झाली आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा मेन या गावातील एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला आहे, तर जिल्ह्यात नऊ जनावरे वीज पडून दगावली आहेत. प्रशासनाच्या वतीने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येते. मात्र वीज पडून जनावरांचा मृत्यू होत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा वेळोवेळी शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शन करत आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामा करण्यात येईल, तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली आहे.