Unseasonal rain : सध्या हवामानात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. या अवकाळी पावसाची काही ठिकाणी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं बळीराजा चिंतेत आहे. हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलेच झोडपले आहे. यामुळं गहू, हरभरा, ज्वारी यासह संत्रे फळबाग पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.  


फळबागांना मोठा फटका


हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली, सेनगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळं शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, ज्वारी यासह संत्रा, मोसंबी या फळबागांना सुद्धा या पावसाचा फटका बसला आहे. सध्या ही सर्व पीक काढणीच्या अवस्थेत होती, परंतू, कालचे वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथील शेतकरी तुळशीराम मस्के यांच्या शेतातील सुद्धा संत्र्याच्या बागाचं मोठं नुकसान झालं आहे. झाडाला लागलेले सर्व संत्रे तुटून जमिनीवर पडले आहेत. त्यामुळं शेतात सगळीकडे संत्रे तुटल्याचं पाहायला मिळत आहे.


शेतामध्ये कापून टाकलेल्या गव्हाच्या पेंड्या पूर्ण भिजल्या


 

हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामध्ये गहू ज्वारी हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये कापून टाकलेल्या गव्हाच्या पेंड्या पूर्णपणे भिजून गेल्या आहेत. त्यामुळं गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच गव्हाच्या पिकावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे खाण्याचे व्यवस्थापन केलेला असतं, परंतू कालच्या पावसामुळं कापून टाकलेला गहू पूर्णपणे भिजला आहे. त्यामुळं या गव्हाला आता खायलासुद्धा चव लागत नाही तर बाजारात विकायचे असेल तर भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. हिंगोलीच्या पुसेगाव शिवारातल्या गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.

मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांनाही बसला फटका


छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबादमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक पावसाने शेतामध्ये गारपीट झाली आहे. यामुळे शेतामध्ये हरबरा, गहू, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

महत्वाच्या बातम्या:


Rain : निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत