Onion Price: सध्या देशात कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ झाली आहे. याचा देशभरातील ग्राहकांना फटका बसत आहे. अशा परिस्थितीत सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. अनेक शहरांमध्ये सरकारी संस्था लोकांना स्वस्त दरात कांदा पुरवत आहेत. आता दिल्ली-एनसीआरमधील लोकांना फक्त 25 रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करुन दिला जात आहे. यामुळं महागाईनं हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
सणांच्या काळात महागाई वाढण्याचा धोका
गेल्या एक-दोन महिन्यांपासून देशभरात कांद्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. देशातील अनेक भागांत कांद्याचे किरकोळ भाव 100 रुपये किलोच्या जवळपास पोहोचले आहेत. कांद्याच्या दरात ही वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा संपूर्ण देश सण-उत्सवात मग्न आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाई पुन्हा नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार हस्तक्षेप करत आहे.
मदर डेअरीच्या स्टोअरमध्ये कमी दरात कांद्याची विक्री
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली-एनसीआरमधील मदर डेअरीच्या सफाल विक्री केंद्रावर लोकांना 25 रुपये प्रति किलो दराने कांदा मिळेल. कांद्याच्या वाढत्या किमतीपासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. दिल्ली-एनसीआरमधील लोकांना सुरक्षित साठवणुकीतून सवलतीच्या दरात कांदा दिला जाईल. अहवालानुसार, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या आठवड्याच्या अखेरीस सफाल मदर डेअरीमध्ये बफर स्टॉकमधून कांद्याची विक्री सुरू होईल. खरिपाचे पीक येण्यास विलंब होत असल्याने कांद्याचे भाव वाढत आहेत. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ विक्री सुरू करण्यात आली आहे.
पुढील आठवड्यापासून दरात घसरण होणार
सरकारनं चालू वर्षासाठी पाच लाख टन कांद्याचा बफर स्टॉक ठेवला आहे. दोन लाख टन अतिरिक्त बफर तयार करण्याची सरकारची योजना आहे. या पावलांमुळं कांद्याच्या घाऊक किंमतीत घसरण झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. किरकोळ बाजारात त्याचा परिणाम दिसायला वेळ लागत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. येत्या आठवड्यापासून किरकोळ किमतीत घट होण्याची शक्यता आहे.
21 राज्यांमधील 55 शहरांमध्ये कमी दरात कांदा उपलब्ध
हैदराबाद अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह युनियन आधीच तेलंगणा आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोकांना अनुदानावर कांदा पुरवत आहे. NCCF आणि NAFED या सहकारी संस्था देखील केंद्र सरकारच्या वतीने सवलतीच्या दरात बफर कांद्याची किरकोळ विक्री करत आहेत. नाफेडने आतापर्यंत 21 राज्यांमधील 55 शहरांमध्ये मोबाईल व्हॅन आणि स्टेशन आऊटलेट्ससह 329 रिटेल केंद्रे स्थापन केली आहेत. दुसरीकडे, NCCF ने 20 राज्यांतील 54 शहरांमध्ये 457 रिटेल केंद्रे सुरू केली आहेत. केंद्रीय भंडारने 3 नोव्हेंबरपासून दिल्ली-एनसीआरमधील त्यांच्या दुकानांमधून कांद्याचा किरकोळ पुरवठा सुरू केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: