Farmers Protest : नाफेडने शासकीय हरभरा खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप असल्याचे दिसून येत आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांनी चक्क विक्रीसाठी आणलेला हरभरा चक्क पेडगाव येथील बंद खरेदी केंद्राबाहेर शिजवला. हा शिजवलेला हरभरा रस्त्यावरील लोकांना वाटून नाफेडच्या निर्णयाचा विरोध केला आहे.
मागील आठ दिवसांपासून नाफेडने परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 17 शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्र अचानक बंद केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना हरभरा खरेदी करण्यासाठी घेऊन येण्याचे मेसेज करण्यात आले. शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी केंद्रावर आणल्यानंतर ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली. त्यामुळे मागच्या 20 मे पासून हजारो शेतकरी या खरेदी केंद्रांबाहेर वाहनांमध्ये आपला हरभरा घेऊन उभे आहेत.
आजही खरेदी केंद्र सुरु न झाल्याने इथे विक्रीसाठी आणलेला हरभरा या शेतकऱ्यांनी शिजवला. या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना वाटून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. हरभराखरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
20 मे पासून हजारो शेतकरी या खरेदी केंद्रांबाहेर वाहनांमध्ये आपला हरभरा घेऊन उभे आहेत. जस जसे दिवस वाढताहेत तसं तसं या गाड्यांचे भाडे वाढत असल्याने आमच्या हाथी काय लागणार? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. एकीकडे खरीप हंगाम सुरु होतोय तर दुसरीकडे हे शेतकरी हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
मुदतीआधीच खरेदी केंद्र बंद
हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्राला 29 मे पर्यंतची मुदत आहे. मात्र, उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं नाफेड आणि एफसीआय या एजन्सीच्या माध्यमातून नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात खरेदी केल्या जाणाऱ्या हरभऱ्याची खरेदी अचानकपणे 23 मे रोजी थांबवली आहे. हरभरा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं कारण पुढे करुन दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आल्याचे दिसत आहे. राज्यात नाफेडद्वारे 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात 4 हजार 200 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता.