Sadabhau Khot : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कांद्याला कमी दर मिळत असल्यानं उत्पादन खर्च देखील निघत नाही. याच मुद्द्यावरुन रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही सरकारला एका आठवड्याची मुदत देतो. जर एका आठवड्याच्या आत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारनं दखल घेतली नाही तर ही शेतकऱ्याची पोरं मंत्रालयावर चालून आल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा खोत यांनी दिला.
नाशिक जिल्ह्यातील रुई येथे आयोजित करण्यात आलेल्या कांदा परिषदेत कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश मांडताना सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. या सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केलं, ह्याचा खुलासा जनतेसमोर केल्याचे खोत म्हणाले.
आम्ही निर्यात आणि वाहतूक अनुदान दिले
ज्यावेळी 2017 -18 ला कांद्याचा दर पडला, त्यावेळी काही कार्यकर्ते माझ्याकडे आले. त्यावेळी निर्णय घेतला की कांद्यावरचे निर्यात शुल्क शून्य करायचे आणि केलेसुद्धा. त्यानंतर इतर राज्यामध्ये जाणाऱ्या कांद्याला वाहतूक अनूदान द्या असा निर्णय घेतला. 10 टक्के निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता असे खोत म्हणाले.
कांद्याला प्रतिकिलो पाच रुपयांचे अनुदान द्या
नाशिकचे पालकमंत्री कांद्याच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत असे म्हणत खोत यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. राज्यात उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. कांद्याच्या बाबातीत तुम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवा. आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत. केंद्राला बाजार हस्तक्षेप योजना राबवायला सांगा असे खोत यावेळी म्हणाले. गुजरात सरकार कांद्याला प्रतिकिलो तीन रुपयांचे अनुदान देत आहे. तुम्ही किमान पाच रुपये अनुदान द्या अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली.
कांदा उत्पादक शेतकरी आता लढणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हायला तयार नाही. शेतकरी स्वत: उन्हात राहतोय आणि कांद्याला फॅनखाली ठेवतोय असे म्हणत खोतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा लगावला. कांदा उत्पादकांचा आवाज जर सरकारला ऐकू येणार नसेल तर कांद्याचा ज्यूस प्यायला देणार असल्याचे खोत म्हणाले. कारण आता कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करणार नाही तर लढाई करणार आहे. ही परिषद कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिशा देणारी ठरेल.
ज्या शेतकऱ्यांचा ऊस उभा आहे, त्यांना हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान द्या, वीज कनेक्शन कट करु नका, द्राक्षाचे देखील मोठ नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकवले आहे. शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज द्या, असे म्हणत कृषीमंत्री तुम्ही महाराष्ट्रात फिरा असेही खोत यावेळी म्हणाले.