Vegetables Prices increased : मुंबई, ठाणे यासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात तर अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. याचा परिणाम कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळत आहे. पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळं भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दर वाढल्यान नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे.


कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये दरदिवसाला 250 ते 300 गाड्यांची आवक होते. मात्र पावसामुळं 150 गाड्यांची आवक होते. आवक घटल्यानं भाज्यांचे भाव कडाडले असून, दर दुपटीने वाढले आहेत. पुणे, नाशिक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातून देखील भाज्यांची आवक सुरु आहे. गुजरातमध्ये देखील काही जिल्ह्यात पूर परिस्थिती आहे. याचा परिणाम कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे. त्यामुळं काही दिवस तरी नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.



होलसेल दर, कोणत्या भाजीला किती दर


कोथींबीर - 60 रुपये जुडी


मेथी - 40 रुपये


भेंडी - 70 रुपये किलो 


सिमला मिरची - 30 रुपये किलो


गवार - 70 रुपये किलो 


वटाणा - 140 किलो 


दोडका - 60 किलो 


दरम्यान, नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी भाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. एपीएमसीमध्ये सध्या पाचशे ते साडेपाचशे गाड्यांची आवक होत आहे. यामुळं जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी भाजीपाला दर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी तब्बल प्रतिकिलो शंभरी गाठलेला टोमॅटो आता 20 ते 25 रुपये किलो दराने विकला जात आहे. तर मेथीचे दरही उतरले आहेत. मेथीच्या एका जुडीसाठी आता दहा रुपये मोजावे लागत होते. तर कल्याणमध्ये भाजीपल्यांच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.