राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
Maharashtra Drought News : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत म्हणून आता राज्यातील सर्व आयपीएस, आयएएस, अधिकाऱ्यांचा पुढाकार घेतला आहे.

Maharashtra Drought News : सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं करपू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत म्हणून आता राज्यातील सर्व आयपीएस, आयएएस, अधिकाऱ्यांचा पुढाकार घेतला आहे. सर्व अधिकाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व आयपीएस, आयएस, अधिकाऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्व अधिकाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी देण्याचे ठरले आहे. सर्व अधिकाऱ्यांनी हे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत कार्यासाठी जमा करण्यास इच्छुक असल्याबाबत सरकारला पत्र दिले होते.
राज्यातील 305 तालुके अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित
महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम 2026 मधील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील 305 तालुके अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सूट आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यांसह विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत.
दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या 305 तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पीक पंचनामे सुरु करण्याचे आदेश
दरम्यान, शासन निर्णयानुसार, दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या 305 तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पीक पंचनामे सुरू करावेत. तसेच सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस निर्देशांक संकलित करुन अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार?
1) जमीन महसुलात सूट.
2) पीक कर्जाचे पुनर्गठन.
3) शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती.
4) 7.5 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात नियमानुसार सूट.
5) शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.
6) रोजगार हमी योजनेच्या कामांचे निकष शिथिल करून अधिक कामे सुरू करणे.
7) आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा.
8) टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करणे.
9) शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू न देणे.
10) जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची व्यवस्था.
11) जलसंधारणाची कामे सुरू करणे.
12) पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी पाण्याचे नियोजन.























