Raju Shetti : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूरमधील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानीचे आंदोलन सुरु आहे. अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी हे देखील आक्रमक झाले आहेत. येत्या 4 मार्चपर्यंत जर दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला नाहीतर आम्ही आंदोलन अधिक धारदार करु असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.


शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, वीज बिलाची अन्यायी वसुली थांबवा, वाढीव बिलाची दुरुस्ती करा इत्यादी  मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयासमोर गेल्या 8 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, बेमुदत धरणे आंदोलनाच्या आठव्या दिवशीही आंदोलनस्थळी असणाऱ्या शेतकऱ्यांना जेवणासाठी विविध ठिकाहू डबे येत आहेत. तसेच विविध ठिकाणच्या ग्रामपंचायतींचा या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. 


शेतकऱ्यांना रात्री 8 ते पहाटे 4 या वेळात वीज देऊ नका. त्यांना हा रात्रीचा वेळ सोडून कधीही वीज द्या. कारण या वेळात शेतकऱ्यांवर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच उष्णतेमुळे साप बाहेर येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री सर्पदंश होण्याची भीती आहे. सर्पदंशाने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या असल्याचे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.


गेल्या आठ दिवसापासून महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास अणुस्करा तालुका शाहुवाडी येथून माता भगिनी व शेतकऱ्यांनी पायी पदयात्रा काढत गेल्या तीन दिवसापासून 65 कि.मी. चा प्रवास करून आज या धरणे आंदोलनास पाठिंबा दिला. मी या सर्व माता भगिनी व शेतकर्यांचा आभारी असल्याचे शेट्टींनी म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी भागामध्ये दिवसा वीजेची अत्यंत गरज असून या परिसरामध्ये वन्यप्राण्यांच्या हल्यात अनेक शेतकरी मृत्यूमुखी व जखमी झाले असल्याचे यावेळी शेट्टी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: