Cotton Rate : भाव वाढेल या अपेक्षेने घरात ठेवलेला कापूस तसाच पडून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागच्या वर्षीपेक्षा जास्त दर येईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला. परंतु, मागच्या वर्षीपेक्षा यंदा कापसाचे दर पडले त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली. मागच्या वर्षी कापसाचा भाव 11000 रुपये क्विंटलवर गेला होता. यावर्षीही दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत कापसाचा भाव गेला. मात्र त्याहीपुढे भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या घरातून कापूस बाहेर काढलाच नाही.  आजही अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या अपेक्षेने घरामध्ये कापूस साठवून ठेवला आहे. परंतु, कापसाचा दर सात ते आठ हजार  रूपयांच्या पुढे जाईना. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  


गेल्या वर्षी कापसाला 11 ते 12 हजार रुपयांचा भाव मिळाल्यामुळे यावर्षी देखील कापसाला जास्त भाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. त्यातच गारपिटीने कापसाचं मोठं नुकसान झालं. दुसरीकडे जो काही कापूस शेतकऱ्यांच्या हाती लागला त्यालाही आता सात ते आठ हजार रुपयांचा भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही घरातच पडून आहे आहे. बीडमधील पाडळसिंगी गावच्या नारायण ननवरे यांच्या कापसाची वेचणी दोन महिन्यापूर्वी संपली. परंतु, कापसाला जास्तीचा भाव मिळेल या अपेक्षेने त्यांनी कापूस घरात साठवून ठेवला. मात्र आता सात ते आठ हजार रुपयांचा भाव कापसाला मिळत असल्याने लागवडीसाठी आणि मशागतीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याचे ननवरे यांनी सांगितले. 


अशी परिस्थिती फक्त एकट्या पाडळसिंगी गावामध्ये नाही तर सर्वच शेतकऱ्यांवर आली आहे. कापसाला या वर्षी 11 ते 12 हजार रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा होती. याच अपेक्षेने महादेव देवगुडे यांनी देखील 30 क्विंटल कापूस घरात साठवून ठेवला आहे. पण आता या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव आल्याने शेतीसाठी घेतलेलं कर्ज या कापूस विक्रीतून कसं फिटणार असा प्रश्न त्यांना पडलाय. 


गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बी बियाणे आणि खताच्या किमतींमध्ये देखील मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे मशागत आणि फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली. मात्र यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र अपेक्षेप्रमाणे कापसाला भाव मिळत नसल्याने कापसाच्या गंजी प्रत्येक घरात पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता सरकारनेच या विषयात लक्ष घालून कापसाला योग्य भाव मिळवून द्यावा असी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.