दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा
एसी केबिनमध्ये बसून दुष्काळाची यादी तयार करता? शेतकऱ्यांच्या बांधावर या आणि पिकांची अवस्था पाहा असे मत शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी व्यक्त केले. बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणीही केली.

Ravikant Tupkar : सध्या राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी (Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस पडलेला नाही. खरीपाची पिकं वाया गेली आहेत. अशातच राज्य सरकारने नुकतीच राज्यातील 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात न आल्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आक्रमक झाले आहेत. एसी केबिनमध्ये बसून दुष्काळाची यादी तयार करता? शेतकऱ्यांच्या बांधावर या आणि पिकांची अवस्था पाहा असे तुपकर म्हणाले. बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी केली. तसेच हेक्टरी 1 लाखांची मदत करावी, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडण्याचा इशारा देखील रविकांत तुपकरांनी दिला आहे.
राज्य सरकारने नुकतीच राज्यातील 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात न आल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 45 ते 50 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरशः होरपळ झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याला दुष्काळसदृश यादीतून वगळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया तुपकरांनी दिली आहे. दुष्काळसदृश परिस्थितीचा निर्णय मंत्रालयातील एसी केबिनमध्ये बसून कागदावर घेतला जात असल्याचा आरोप करत तुपकरांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला.
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असती तर केवळ 18 नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळसदृश यादीत आले असते. शेतकऱ्यांना कमीत कमी मदत द्यावी लागावी म्हणूनच ही यादी तयार करण्यात आली आहे का?” असा सवाल रविकांत तुपकरांनी उपस्थित केला.
बुलढाण्यात पिके करपली, तरी सरकारला दिसत नाहीत का?
बुलढाणा जिल्ह्यात तब्बल दीड महिन्याच्या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडला. कडक उन्हामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाऐवजी कडक ऊन पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. 12 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला असला, तरी पिकांना आवश्यक असलेल्या काळात पाऊस न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे तुपकरांनी म्हटले आहे.
बुलढाण्याला दुष्काळाच्या यादीत घ्या, हेक्टरी 1 लाखांची मदत द्या
बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्याला तातडीने दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करावे, कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे. शेतकऱ्याने पिकासाठी पैसा खर्च केला, मेहनत केली, रात्रंदिवस कष्ट केले. पाऊस नाही म्हणून पीक हातातून गेलं. आता सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं का? बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीत घ्या आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या,” अशी मागणी तुपकरांनी केली.
कांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलं आहे का? सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सुनावले खडे बोल
बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे एक खासदार आणि सहा आमदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींना लक्ष्य करत रविकांत तुपकरांनी थेट सवाल केला.लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलं आहे का? असा सवाल तुपकरांनी केला. गल्लीत आणि मतदारसंघात राजकीय स्वार्थासाठी एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा मंत्रालयात जाऊन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी भांडा. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे, अशा शब्दांत तुपकरांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सुनावले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येण्यास काय अडचण आहे?
काही दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नेते आपले राजकीय मतभेद आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून एका पॅनलमध्ये एकत्र आले आणि निवडणूक लढले. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येण्यास काय अडचण आहे? असा सवाल तुपकरांनी केला.






















