Beed : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरणझाली आहे. बाजारात कांद्याला मिळणाऱ्या दराने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील देवळा बुद्रुक येथील शेतकरी गणेश तोडेकर यांनी बीडच्या बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्याने सोलापूर मार्केटमध्ये आपला कांदा नेला. परंतू कांदा विक्रीतून त्यांना पैसे मिळणं अपेक्षित असताना गणेश तोडेकर यांनाच आपल्याच पदरचे 301 रुपये खर्च करण्याची वेळ आली. 

 12 क्विंटल 87 किलो कांद्याचे 1468 रुपये आणि खर्च 1769 झाला

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 12 क्विंटल 87 किलो कांद्याचे 1468 रुपये आले. त्यात हमाली, तोलाई, मोटार भाडे असा खर्च 1769 झाला. उलट या शेतकऱ्याला स्वतःच्याच खिशातून 301 रुपये घालावे लागले. काही दिवसांपूर्वीच बीडच्या धारुर तालुक्यातील शेतकऱ्यावर देखील हीच वेळ आली होती. सध्या बीड जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक शेती सोडून इतर पिकांकडे वळतो आहे. मात्र, त्या ठिकाणी देखील शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होते आहे. सध्या मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात या दराने पाणी आणलं आहे.

राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल

राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आखाती देशातील युद्ध, निर्यात बंदी आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा खर्चही (Onion Price Crisis) निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने कांद्याला किमान 2 ते 3 हजार हमीभाव द्यावा तसेच प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे. नाफेडमार्फत कांदा खरेदी (Onion Price) सुरू करावी. केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन स्थिर निर्यात धोरण लागू करावे अशा अनेक मागण्याशेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.  

12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरु करण्याचा निर्णय

आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, अनेक शेतकरी कांद्याला एक रुपये भाव मिळतो म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. म्हणून मी कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांना सांगितलं, काही झालं तरी कांदा विकत घ्या, कांद्याचं शेल्फ लाईफ जास्त नाही. त्याची खरेदी, साठवणूक करुन तो पुन्हा बाजारात आणायचा, हे सगळं अडचणीचं असतं. पण आपल्या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रात शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरु होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

कांद्याला हमीभावासह अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक