Agriculture News : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला अखेर मुहूर्त सापडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या हस्ते शिर्डीत उद्यापासून या योजनेचा शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील 86 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा होणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
दोन योजनेचे मिळून वर्षाला शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळणार
दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो सन्मान योजनेचे मिळून एकूण शेतकऱ्यांना 12 हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत. नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे उद्या शिर्डी येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-वितरण होणार आहे. यासाठी 1 हजार 720 कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. पीएम किसान आणि 'नमो किसान महासन्मान' योजनेअंतर्गत कृषी विभागाने मोहीम हाती घेऊन 9 लाख 58 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी, 2 लाख 58 हजार शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न, 1 लाख 29 हजार शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी अशा एकूण 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण केले आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला जून 2023 मध्ये मिळाली होती मान्यता
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6000 रुपयांचे अनुदान दिले जाते. राज्य शासनाच्या आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळमार आहेत. निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: