Tomato Price Hike : सध्या टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत. कारण सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ (Tomato Price Hike) झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. भारतातील टोमॅटो पाकिस्तानात निर्यात होत आहे. तिथं निर्यात होणाऱ्या टोमॅटोला चांगला दर मिळत असल्यानं राज्यातील टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. सध्या टोमॅटोला किलोला 80 ते 90 रुपयांचा दर मिळत आहे. महाराष्ट्रात मात्र, उत्पादनात घट झाल्यानं दक्षिणेकडील राज्यातून टोमॅटोची आयात केली जात आहे.
विदर्भातील विशेषतः पूर्व विदर्भातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून भाजीपाल्यांची शेती करतात. उन्हाळ्यात रब्बी पिकांसह भाजीपाल्याची शेती केल्यानंतर खरीप हंगामात भाजीपाल्यांची लागवड कमी प्रमाणात होते. त्यामुळं पूर्व विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो किंवा अन्य पालेभाज्या लावल्या त्यांचा भाजीपाला मे महिन्यानंतर बाजारात येणं बंद होते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून, पालेभाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेषत: दररोजच्या भाजीत उपयुक्त असलेले टोमॅटोचे 15 दिवसात दर 80 रुपयांपर्यंत गेले आहेत.
महाराष्ट्रात आंध्र प्रदेशसह तामिळनाडू आणि तेलंगणातून टोमॅटोची आयात
पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांकडे टोमॅटो बाजारात येणं बंद झाले आहे. या भागातील गृहिणी आणि ग्राहकांना लागणाऱ्या टोमॅटोचा पुरवठा करता यावा यासाठी आता दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यातून भंडाऱ्यासह पूर्व विदर्भात टोमॅटोची आयात होत आहे. एकट्या भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास दररोज 10 हजार कॅरेट टोमॅटोची गरज आहे. मात्र, पाकिस्तानातील निर्यात वाढल्यानं भंडारा जिल्ह्याला केवळ तीन हजार कॅरेट्स पुरवठा होत आहे. पाकिस्तानात टोमॅटो जात असल्यानं आणि पूर्व विदर्भातील मागणी बघता टोमॅटोचे दर प्रति कॅरेट दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एका कॅरेटला 300 रुपये मोजावे लागत होते, ते आता तब्बल 1700 रुपयांनी वाढले असल्याने प्रति किलोचा दरही 10 रुपयांवरून थेट 90 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. टोमॅटोसह अन्य पालेभाज्यांच्या दरातही मोठ्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे.
विदर्भात टोमॅटोच्या उत्पादनात घट
सध्या राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. या काळातच टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. विदर्भात टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली आहे. याचा परिणाम सध्या दरा होत असल्याचे चित्र दिसत आहे. उत्पादन घटल्यानं विदर्भात दक्षिणेतील राज्यातून टोमॅटोची आयता होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: