बारामती, पुणे : केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी (Sugar Export Ban) घालणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साखरेच्या निर्यातीवर बंधने आणावीत याबाबत केंद्र सरकारच्या मंत्रालयात चर्चा सुरु आहे. साखर निर्यातीवर जर बंदी घातली तर साखरेचे बाजारभाव कमी येतील असे शरद पवार म्हणाले. याबाबत मी काही लोकांची चर्चा केल्याचे पवार म्हणाले.


कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता


यावर्षी आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत आगामी सणासुदीचा हंगाम आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऊसाची लागवड केलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात  यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. या दोन राज्यांमध्ये देशातील 50 टक्के कच्च्या साखरेचे उत्पादन होते. पावसाअभावी या हंगामात दोन्ही राज्यांमध्ये साखरेचं उत्पादन कमी होईल असा अंदाज आहे. मात्र पुढील हंगामात ऊस लागवडीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकार निर्यातीवर बंदी घालू शकते. जर बंदी घातली तर दर घसरण्याची शक्यता असल्याचे शरद पवार म्हणाले.


मी कृषीमंत्री असताना 40 टक्के कर लावला नाही


दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी कांदा निर्यातीवर आकारलेल्या शुल्काबाबत देखील वक्तव्य केलं. मी कृषीमंत्री असताना 40 टक्के कर कधी लावला नव्हता. सरकारने 40 टक्के कर का लावला आहे, त्याचा खुलासा करावा असे शरद पवार म्हणाले.


राज्यात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील


आम्ही विविध संस्थांकडून जी माहिती घेतोय  त्याच्यामध्ये आम्हाला दिसत आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळतील असे शरद पवार म्हणाले. लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. यामध्ये कोणीही चिंता करण्याची गरज नाही असे पवार म्हणाले. कोणीही जाहीर सभा घेऊ शकतो. जनतेला नक्की काय सत्य आहे ते माहिती असल्याचे शरद पवार म्हणाले. जर सभा घेऊन कोण आपली भूमिका मांडत असेल तर मी त्यांच स्वागत करतो असेही पवार म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही, याला फूट कशी म्हणता येईल. काही लोकांनी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही. तो त्यांचा निर्णय असल्याचे पवार म्हणाले.